सोलापूर : तुझा सांभाळ करतो, काही कमी पडू देणार नाही, असे सांगून विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी अकाऊंट विषयाची शिकवणी घेणाºया प्राध्यापकावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी न्यायालयात उभे केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
व्यंकटेश राजमोगले पडाल (वय ४४, रा. साईबाबा चौक, अशोक चौक, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. आॅक्टोबर २०१८ मध्ये बोल्ली मंगल कार्यालय येथे कपड्याचा सेल लागला होता. तेथे पीडित महिला कपडे खरेदी करण्यासाठी गेले होती, तेव्हा प्रा. व्यंकटेश पडाल हा तिच्याकडे पाहत होता. महिलेने दुर्लक्ष केले असता तो जवळ जाऊन मी शिक्षक आहे, अकाऊंटची शिकवणी घेतो. तू माझ्याकडे ट्यूशन लाव, असे सांगितले.
प्रा. व्यंकटेश पडाल याने सांगितल्याप्रमाणे पीडित महिलेने राजेंद्र चौक येथील पडाल याच्या शिकवणी वर्गात गेली. दररोज सकाळी १० ते १२ या वेळेत ट्यूशन घेत असताना प्रा. व्यंकटेश पडाल हे महिलेची मस्करी करीत होते. ९ जानेवारी २०१९ रोजी तुळजापूरच्या देवीला जाऊ म्हणून महिलेला मोटरसायकलवर घेऊन तो तुळजापूर रोडच्या दिशेने निघाला. रस्त्याच्या मध्ये एका लॉजसमोर गाडी थांबवली, तेथे महिलेने विचारणा केली.
आपण आत जाऊ तेथे तुला सगळं सांगतो, असे म्हणून रूममध्ये नेले. रूममध्ये तू मला खूप आवडतेस, आपण लवकरच लग्न करणार आहोत, असे सांगून महिलेवर अत्याचार केला. ५ ते ६ दिवसांनंतर प्रा. व्यंकटेश पडाल याचे लग्न झाल्याची माहिती महिलेला समजली. तिने तुमचे लग्न झाले आहे, ही गोष्ट का सांगितली नाही. तुम्ही धोका दिला आहे, यापुढे माझ्या नादी लागू नका, असे पीडित महिलेने पडाल याला बजावले. मात्र प्रा. व्यंकटेश पडाल याने तुला माझ्यासोबत असेच रहावे लागेल, अन्यथा मी तुझी बदनामी करेन, तुझे जगणे मुश्कील करेन, अशी दमदाटी केली. या प्रकाराला कंटाळून महिलेने जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास फौजदार अश्विनी जाधव या करीत आहेत.
पीडित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्नपडाल याने दिलेल्या धमकीमुळे पीडित महिला मानसिक तणावाखाली आली होती. बदनामीला घाबरून तिने एकेदिवशी विषारी द्रव प्राशन केले. तिला त्रास होऊ लागल्याने तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.