सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड ३१ डिसेंबरला होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 11:08 AM2019-12-13T11:08:33+5:302019-12-13T11:10:08+5:30
शासनाने पाठविले परिपत्रक : पंचायत समिती सभापती निवडही त्याचवेळी
सोलापूर : झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापती पदाची २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आलेली निवडणूक स्थगित करण्यात आली आहे अशी माहिती उप जिल्हाधिकारी (महसूल) गजानन गुरव यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
सायंकाळी दिली.
विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी २१ डिसेंबर रोजी झेडपी अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतीची निवड होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावर झेडपीचे सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी या निवडीसाठी २१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विशेष सभा बोलावण्यात आल्याची नोटीस जारी केली आहे. झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदांसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याची मुदत सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत आहे.
पीठासन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी संदीप जाधव यांच्या उपस्थितीत सभा सुरू झाल्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांना माघार घेण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. त्यानंतर लगेच निवडणुकीचे कामकाज सुरू करण्यात येणार आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यावर राजकीय वर्तुळात हालचाली वाढल्या आहेत. झेडपीचे अध्यक्षपद एससी सर्वसाधारणसाठी आरक्षित झाले आहे.
यानुसार पाच पुरुष व पाच महिला सदस्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. त्यात महाविकास आघाडी व समविचारी आघाडीतर्फे कोणाचे नाव येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीतील पदाधिकाºयांची सोमवारी बैठक बोलावली आहे तर भाजपच्या गोटात समविचारीची जुळणी करण्याच्या गुप्त हालचाली सुरू आहेत.
झेडपी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी अशा हालचाली सुरू असतानाच गुरुवारी शासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयास आलेल्या संदेशावरून निवडणूक कार्यक्रमाबाबत तातडीने अहवाल मागविण्यात आला आहे. विधानसभा निवडणुका आणि अतिवृष्टीमुळे शासनाने २३ आॅगस्ट रोजी एका अद्यादेशाद्वारे झेडपी अध्यक्ष व पंचायत समिती सभापतीपदांना १२० दिवसांची मुदतवाढ दिली. २० डिसेंबर रोजी ही मुदत संपत असल्याने २१ डिसेंबर रोजी निवडणुका घेण्याचे निश्चित करून जिल्हाधिकाºयांनी निवडीचा हा कार्यक्रम घोषित केला होता. पण झेडपी अध्यक्षाच्या निवडणुका काही काळासाठी पुढे ढकलाव्यात, अशी मागणी काही आमदारांनी केल्याने शासनाने याबाबत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माहिती घेतली.
शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून सायंकाळी या निवडणुकीबाबत परिपत्रक आल्याचे उप जिल्हाधिकारी गजानान गुरव यांनी सांगितले. या पत्रानुसार ग्रामविकास विभागाने १0 डिसेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार निवडीचा कार्यक्रम घेण्याचे सूचित केले आहे. २0 डिसेंबर रोजी अध्यक्ष व सभापतीची मुदत संपल्यानंतर २१ डिसेंबर रोजी निवडीसाठी दहा दिवसाची नोटीस जारी केली जाईल. त्यानंतर ही निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे २१ डिसेंबरची तारीख आता स्थगित झाली आहे.
२१ डिसेंबरची तारीख स्थगित
ग्रामविकास विभागाने अचानक गुरूवारी परिपत्रक काढून झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती निवडीचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. आता दहा दिवसाची नोटीस गृहित धरल्यास वर्षाअखेर म्हणजे ३१ डिसेंबरला मुहूर्त लागू शकतो, अशी माहिती देण्यात येत आहे. पण आता २0 डिसेंबरला अध्यक्ष व सभापतींचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन निवड होईपर्यंत हंगामी म्हणून तेच पदाधिकारी कारभारी म्हणून राहणार का हे अजून स्पष्ट झाले नाही. २१ डिसेंबरला निवडणूक म्हणून गुरूवारची झेडपीची स्थायी सभा झाली नाही हे विशेष.