सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडे विविध विभागातून निधी आला असून आत्तापर्यंत ५ कोटी ८४ लाखाचे साहित्य खरेदी करण्यात आले आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली.
कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यावर जिल्हा आरोग्य विभागाचे काम वाढले. साथीच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्याचा आराखडा तयार करण्यात आला. यासाठी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३३४ उप केंद्रासाठी औषध, डॉक्टर व कर्मचाºयांसाठी विषाणू संसर्गाचे साहित्य, उपकरणे खरेदीसाठी जिल्हा नियोजन, स्थानिक विकास योजना अणि झेडपीच्या निधीतून तरतूद करण्यात आली.
साहित्य खरेदीसाठी टेंडर व शासनाने ठरविलेल्या आरसीप्रमाणे साहित्य खरेदी करण्याचे नियोजन करण्यात आले. टेंडर प्रक्रियेला वेळ लागला, पण आरसीवरून गरजेचे साहित्य खरेदी करण्यात आले. यासाठी मुंबई महापालिकेने कोरोना संसर्गाच्या काळात खरेदी केलेल्या साहित्यांवर भर देण्यात आला. साहित्य, उपकरण व औषध खरेदी नियमाप्रमाणे झाली असल्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी केला आहे.
खरेदीसाठी असा आला निधी
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी जिल्हा नियोजनमधून दोन वर्षाच्या काळातील निधी देण्यात आला. त्यामध्ये सन २0१९—२0 मधून २ कोटी ५४ लाख ६४ हजार, सन २0२0—२१ मधून १ कोटी ९९ लाख ९९ हजार असे ४ कोटी ५४ लाख ६३ हजार रुपये मिळाले. स्थानिक आमदार निधीतून २ कोटी ३२ लाख ५३ हजार तर झेडपीच्या स्थानिक निधीतून १ कोटी घेण्यात आले. अशाप्रकारे कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासाठी ७ कोटी ८७ लाख १६ हजार निधी मिळणार असे गृहित धरून खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
असा होत आहे खर्च
कोरोना प्रतिबंधासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी पुढीलप्रमाणे पैसे खर्च झाले आहेत. जिल्हा नियोजन, स्थानिक आमदार व सेसमधून ६ कोटी ४३ लाख ८५ हजार झेडपीच्या तिजोरीत जमा झाले. त्यातून जिल्हा नियोजनमधील: ४ कोटी ४६ लाख ६0 हजार. स्थानिक आमदार निधी: ९७ लाख २५ हजार, झेडपी सेस:६४ लाख खर्च झाले. टेंडर प्रोसेस: २९ लाख. शिल्लक रक्कम: जिल्हा नियोजन:४ लाख ९ हजार ९२४, स्थानिक आमदार निधी: १९ लाख १७ हजार २१९, सेस: ३६ लाख १0 हजार, एकूण: ५९ लाख ३७ हजार २0३ रुपये.
यामुळे झाला खरेदीला विलंब
जिल्हा आरोग्य विभागाने आरसीमधून थेट गरजेच्या वस्तू खरेदी केल्या. पण देशभरात एकाचवेळी साथ सुरू असल्याने साहित्य मिळण्यास उशीर होत गेला. तसेच खरेदी मंजुरीच्या फायली फिरत राहिल्या. टेंडर प्रोसेसमध्ये वेळ गेला. त्यामूळे खरेदी वादातीत ठरली. अजूनही आरोग्य केंद्राला पुरेसे साहित्य मिळाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. जे साहित्य येत आहे त्याच्या गुणवत्तेबाबतही ओरड होत आहे. शिवाय आॅर्डर दिल्याप्रमाणे साहित्य आले की नाही याची महसूल यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी अशी सदस्यांची मागणी आहे.