सोलापूर : मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अन् नववर्षाच्या स्वागतासाठी शहरवासीय प्रतीक्षा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान रात्री ११.५५ ते १२.३० या ३५ मिनिटांच्या कालावधीत फटाके फोडून नवीन वर्षाचे स्वागत करा. रस्त्यांवर हुल्लडबाजी नको, घरी आपल्या कुटुंबीयांसमवेत आनंदोत्सव साजरा करा, असे आवाहन पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी ‘लोकमत’ 'शी बोलताना केले आहे.
शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरातील ७८ ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात येणार आहेत. यासाठी ३ पोलीस उपायुक्त, ५ सहायक पोलीस आयुक्त, ५५ सहायक पोलीस निरीक्षक, ९८५ पोलीस कर्मचारी, २५ महिला पोलीस, १ एसआरपी कंपनी असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार हॉटेल अथवा सार्वजनिक ठिकाणी रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकावर बंदी कायम आहे. त्याचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहाटे ५ पर्यंत राहणार हॉटेल सुरू - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल सुरु राहतील, मात्र यासाठी हॉटेलचालकांनी रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. मद्यप्राशन करुन फिरणाºयांवर कठोर कारवाई केली जाईल. यासाठी १०० ब्रिथ अॅनालायझर मशीनची व्यवस्था केली आहे. रात्री फिक्स पॉइंट व शहरातील विविध चौकांतील पोलिसांकडे ही मशीन देण्यात येणार आहे. फटाक्यांची ध्वनिमर्यादाही तपासण्यात येईल. यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे गैरवर्तन करणाºयांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.