सोलापूरकरांनो... सावधान कोरोनासोबत डेंग्यूचाही वाढतोय धोका; सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 04:52 PM2022-01-11T16:52:46+5:302022-01-11T16:52:50+5:30
पाणी साचू न देण्याचे केले आवाहन
सोलापूर : कोरोना विषाणू संसर्गासोबत डेंग्यूच्याही संकटाला तोंड द्यावे लागत आहे. मागील तीन महिन्यांची परिस्थिती पाहिली तर डेंग्यूंच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी डेंग्यूचा धोका अद्याप टळला नाही.
डेंग्यू, मलेरिया यांसारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा, यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी हिवताप कार्यालय व महापालिकेच्या कीटकनाशक खात्याद्वारे नियमितपणे करण्यात येत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवताप कार्यालयाद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
या तपासणीदरम्यान इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांमधील पाण्याचे पिंप, प्लास्टिक किंवा ताडपत्रीमध्ये साचलेले पाणी, परिसरात पडून असले टायर व त्या टायरमध्ये साचलेले पाणी, झाडांच्या कुंड्यांखालील ताटल्या, शोभिवंत झाडांच्या कुंड्या, पाणी असणाऱ्या शोभेच्या वस्तू, नारळाच्या करवंट्या व त्यात साचलेले पाणी, फेकून दिलेल्या पाण्याच्या बाटल्यामधील किंवा बाटल्यांच्या झाकणांमधील पाणी इत्यादींची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, सहायक जिल्हा हिवताप अधिकारी विजय बागल, महापालिकेतील जीवशास्त्रज्ञ पूजा नक्का यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
--------
मागील तीन महिन्यांतील शहरातील आकडेवारी
- महिना नमुने घेतले डेंग्यू पॉझिटिव्ह
- ऑक्टोबर २५० ८८
- नोव्हेंबर १०७ ३०
- डिसेंबर ५४ १२
----------------
ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी
सध्या पावसाळा नसला तरी काही ठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. शहरातील डेंग्यू रुग्णांशी तुलना करता ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी आहे. शहरात घरे जवळ-जवळ असणे, कमी जागेत जास्त लोक राहणे यामुळे आजाराचे प्रमाण जास्त दिसून येते. ग्रामीण भागात डिसेंबर २०२१ मध्ये ४९ जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले. यातून १६ जणांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले.
..ही घ्या काळजी
- - आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा
- - आठवड्यातून एक दिवस कोरोडा दिवस पाळा
- - नियमित मच्छरदाणीचा वापर करा
- - आपण वास्तव्य करीत असलेल्या परिसरात पाणी साचू देऊ नका
- - ताप असल्यास त्वरित जवळच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
------------