श्रमदानाचे नक्कीच चीज होईल; दुष्काळ मिटेल !
By appasaheb.patil | Published: May 6, 2019 03:54 PM2019-05-06T15:54:21+5:302019-05-06T16:03:23+5:30
पाणी फाउंडेशन (वॉटर कप) स्पर्धेचे जिल्हा समन्वयक सत्यवान देशमुख याचा विश्वास
आप्पासाहेब पाटील
सिनेअभिनेता अमीर खान याच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेला सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र सुरूवात झाली आहे़ दुष्काळाशी दोन हात करून श्रमदानासाठी एकवटलेल्या गावांची कहाणी वेगळीच आहे़ अशा आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे नेतृत्व करून जिल्हा समन्वयकाची जबाबदारी स्वीकारणारे सत्यवान देशमुख यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : यंदा सोलापूर जिल्ह्यातील वॉटर कप स्पर्धेविषयी काय सांगाल ?
उत्तर : यंदा वॉटर कप स्पर्धेचा चौथा टप्पा आहे़ यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील २८० पैकी १५९ गावांत श्रमदानाचे काम सुरू झाले आहे़ ८ एप्रिल ते २२ एप्रिलपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे़ दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी गावातील ग्रामस्थ एकत्र येऊ लागले आहेत़ श्रमदानाचे काम मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने भविष्यात पावसाचे पाणी साचून गावे पाणीदार होतील यात शंका नाही.
प्रश्न : सहभागी गावांचा प्रतिसाद कसा आहे ? कितपत परिणाम दिसून येईल.
उत्तर : यंदाच्या वर्षी गावांचा सहभाग अतिशय चांगला आहे़ गाव पाणीदार करण्यासाठी गावातील लोक एकत्र येऊ लागलेले आहेत़ सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत आपल्या गावपरिसरातील माळरानावर श्रमदान करण्यात ग्रामस्थ, सामाजिक संस्था, संघटना, शाळा, महाविद्यालये, लोकप्रतिनिधी आदींचा सहभाग वाढत आहे़ या कामाचा नक्कीच परिणाम दिसून येणार आहे़ भविष्यात चांगला पाऊस झाल्याने नक्कीच गावे पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होतील.
प्रश्न : महाश्रमदान कसे झाले ?
उत्तर : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील सहा गावांत महाश्रमदानाचे आयोजन केले होते़ शिवाय काही गावांनी उत्स्फूर्तपणे महाश्रमदानाचे स्वरूप देऊन मोठ्या प्रमाणात श्रमदान केले़
ईश्वर चिठ्ठीद्वारे गावांची मदत
यंदा स्रेहालय प्रकल्प, अहमदनगर या संस्थेच्यावतीने वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यात येत आहे़ प्रत्येक शनिवारी सहभागी गावांची मदत निधी देण्यासाठी चिठ्ठीव्दारे निवड केली जात आहे़ या उपक्रमाला ईश्वर चिठ्ठी असे नाव देण्यात आले आहे़ आतापर्यंत १०० हून अधिक गावांना प्रत्येकी १ लाख रूपयांची मदत स्रेहालय संस्थेतर्फे देण्यात आली़
संस्था, संघटनांनी पुढे यावे
वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना मदत करण्यासाठी सोलापूर शहर व जिल्ह्यातील सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी पुढे येण्याची गरज आहे़ या जमा झालेल्या देणगीच्या माध्यमातून श्रमदानस्थळी मशीनचा वापर करून मोठ्या प्रमाणात काम करण्यात येईल अशीही माहिती जिल्हा समन्वयक देशमुख यांनी दिली़