महाराष्ट्रातील एसटी गाड्यांना विजापूर, गाणगापूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांत प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 06:00 PM2021-09-22T18:00:12+5:302021-09-22T18:00:19+5:30
एसटीच्या उत्पन्नावर परिणाम : कर्नाटक बसला प्रवेशबंदी करण्याची मागणी
सोलापूर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे एस.टी.च्या फेऱ्यांचे वेळापत्रक पूर्वपदावर येत आहे. आता आंतरराज्य फेऱ्याही सुरू करण्यात येत आहेत; पण महाराष्ट्रातील गाड्यांना कर्नाटकातील विजापूर, गाणगापूर आणि गुलबर्गा जिल्ह्यांत प्रवेश दिला जात नाही; पण कर्नाटकाच्या गाड्या मात्र बिनदिक्कत महाराष्ट्राच्या हद्दीत ये-जा करीत आहेत; यामुळे कर्नाटकाच्या गाड्यांवर बंदी घालावी, अशी मागणी होत आहे.
सोलापूर विभागाच्या गाड्यांना विजापूर जिल्ह्यात फक्त सीमेपर्यंतच प्रवेश दिला जातो. याच मार्गावर कर्नाटकाच्या गाड्यांच्या फेऱ्या मात्र सुरू आहेत. यामुळे या मार्गावरील उत्पन्न कर्नाटकाच्या गाड्या घेऊन जात आहेत; परिणामी एसटीचे रोज जवळपास दोन लाखांचे नुकसान होत आहे, अशी माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. एका रात्रीत गुलबर्गा विभागाच्या पाच ते सहा एस.टी. गाड्या सोलापूर आगारात येत असल्याची माहितीही कर्मचाऱ्यांनी दिली.
या मार्गावर धावत आहेत गाड्या
- सोलापूर - विजापूर
- सोलापूर - हैदराबाद
- सोलापूर - गुलबर्गा
उत्पन्न समाधानकारक
सोलापूर आगारातील एसटी गाड्या विजापूर आणि हैदराबाद मार्गावर धावत आहेत. हैदराबाद मार्गावर एसटीला चांगले उत्पन्न मिळत आहे. हे उत्पन्न कोरोनापूर्वीच्या तुलनेत दहा ते पंधरा हजार रुपयांनी घसरले आहे. पण सध्या वीस ते पंचवीस हजार रुपये मिळत असले तरी समाधानकारक असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
स्लॉट मिळतो, तेव्हा ड्यूटी लागते
लसीकरणाचे लपंडाव सोलापूर विभागातील जवळपास ८० ते ८५ टक्के कर्मचाऱ्यांचे पहिले आणि दुसरे डोस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ही सुरक्षिततेची भावना आहे. सोबतच प्रवाशांमध्ये ही प्रवासावेळी सुरक्षित वाटत आहे. जे उर्वरित कर्मचारी आहेत ते कर्मचारी जेव्हा लसीकरणासाठी वेळ निश्चित करतात त्याच वेळी त्यांना कामावर जावे लागते, अशा लपंडावामुळे त्यांचे लसीकरण पूर्ण होऊ शकले नाही, असे काही कर्मचाऱ्यांचे मत आहे.
सोलापूर विभागातील कर्नाटक मार्गावरील जवळपास १५ ते २० गाड्यांचे फेऱ्या बंद आहेत. त्या बंद असल्यामुळे त्याचा परिणाम एसटीच्या उत्पन्नावर होत आहे. कामगारांचे वेतन वेळेवर न मिळण्याचे हे मुख्य कारण आहे. यामुळे ज्याप्रमाणे कर्नाटकामध्ये प्रवेश करण्यास आपल्या राज्याच्या गाड्यांना बंदी घातली आहे, त्याप्रमाणे आपल्या प्रशासनानेही कार्यवाही करायला पाहिजे.
- अविनाश माचनूरकर, एसटी कामगार सेना, कार्याध्यक्ष