सोलापूर शहरातील खड्ड्यांचे फोटो अॅपवर पाठवताच अत्याधुनिक यंत्रानं रस्ता होणार चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 02:55 PM2019-02-06T14:55:22+5:302019-02-06T14:57:51+5:30
राकेश कदम सोलापूर : शहरातील रस्त्यांवर नेमके कुठे व किती खड्डे आहेत, याची तंत्रशुद्ध माहिती मिळावी. हे खड्डे दुरुस्तीचे ...
राकेश कदम
सोलापूर : शहरातील रस्त्यांवर नेमके कुठे व किती खड्डे आहेत, याची तंत्रशुद्ध माहिती मिळावी. हे खड्डे दुरुस्तीचे काम झाले की यावर महापालिका आयुक्तांचे लक्ष असावे, यासाठी बंगळुरु येथील जनाग्रह सामाजिक संस्था आणि सोलापूर महापालिकेच्या वतीने एक मोबाईल अॅप विकसित करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी नुकताच यासंदर्भात जनाग्रहसोबत करार केला आहे. हे काम सुरू असताना दुसरीकडे महापालिकेने खड्ड्यांची दुरुस्ती तंत्रशुद्धपणे व्हावी, यासाठी अत्याधुनिक मशीन खरेदीची निविदा काढली आहे.
शहरातील मुख्य रस्ते आता चांगले असले तरी छोट्या रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या तोंड वर काढते. नगरसेवक आणि सामान्य नागरिक महापालिका आणि विभागीय कार्यालयात हेलपाटे मारतात. अधिकाºयांचे दुर्लक्ष झाले की त्यावरुन राजकारणही होते. अनेकदा या खड्ड्यांची माहिती वरिष्ठ अधिकाºयांपर्यंत पोहोचत नाही.
अशा विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी एक मोबाईल अॅप विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. यासाठी बंगळुरु येथील जनाग्रह सेंटर फॉर सिटीझनशिप अँड डेमोक्रसी या बिगर सरकारी संस्थेशी करार केला आहे.
या संस्थेने स्वच्छ भारत मिशनसाठी अॅप तयार केले असून, त्याचा वापर देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुरू आहे. खड्ड्यांबाबतच्या अॅपमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश असावा, यासंदर्भात जनाग्रह संस्थेतील अभियंत्यांशी चर्चा झाली आहे. सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो मोबाईल अॅपवर काढतील. अॅपमधून खड्ड्याचे तंत्रशुद्धपणे सर्वेक्षण होईल. हे फोटो एका स्क्रीनवरही पाहता येतील. त्याची माहिती संबंधित बांधकाम विभागाला दिली जाईल. सध्या अनेक मुद्यांवर काम सुरू आहे. लवकरच हे अॅप तयार होईल, असा दावाही डॉ. ढाकणे यांनी केला.
पावसाळ्यातही करता येईल काम अशी मशीन घेणार
- - महापालिकेकडे खड्डे बुजविण्यासाठी मशीन आहेत. पण त्यांचे आयुष्यमान संपले आहे. खड्डे तंत्रशुद्ध पद्धतीने बुजविता यावेत, महापालिकेने एक मशीन खरेदी करण्याची निविदा काढली आहे. ही निविदा दोन कंपन्यांनी भरली आहे.
- - या मशीनमध्ये स्वयंचलित पद्धतीने डांबर आणि खडी यांचे मिश्रण होईल. खड्ड्यांचा आकार निश्चित करून त्यात प्रेशरने धूळ साफ केली जाईल. प्रेशरनेच रस्त्याच्या लेव्हलला खड्डा बुजवून घेतला जाईल.
- - आजूबाजूला डांबरचा थर जमणार नाही. जुन्या मशीनद्वारे पावसाळ्यात काम करता येत नाही. पण नव्या मशीनद्वारे पावसाळ्यातही काम करता येईल, अशी माहिती महापालिकेचे रस्ते अभियंता युसूफ मुजावर यांनी दिली.
रस्त्यावरील खड्डे हा विषय आर्थिक आणि सामाजिक पातळीवरही नुकसान करतो. आर्थिक नुकसान हे केवळ त्या व्यक्तीचे नव्हे तर संस्था, शासनाचेही होते. या समस्येचे वेळेवर निराकरण व्हायला हवे. त्याची माहिती वेळेवर महापालिका प्रशासनाला मिळावी, यासाठी मोबाईल अॅप आणि अत्याधुनिक मशीनरी खरेदी करण्यात आली आहे. जग खूप पुढे चालले आहे. बांधकाम विभागात नव्या तंत्राचा वापर होतोय. तीच पद्धत सोलापूर महापालिकेने स्वीकारावी, असा प्रयत्न आहे.
- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, महापालिका