सोलापूर : मागील दोन वर्षांपासून वारी झाली नाही. त्यामुळे यंदा वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यामुळे अधिक गर्दी होऊ शकते. या गर्दीत अत्यावस्थ रुग्ण असल्यास त्याला त्वरित उपचार मिळणे गरजेचे असते. हे ओळखून यंदा वारीमध्ये ३५ बाइक ॲम्बुलन्सची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली.
वारीनिमित्ताने जिल्ह्यातील ७० गावांत वारकरी येत असतात. या सर्व गावांत किमान आवश्यक सुविधा वारकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. वारीमार्गावरील प्रमुख गावात पाणी, शौचालय, रस्तेसाठी निधी देण्यात येत आहे. या गावातील ८० टक्के कामेही पूर्ण झाली आहेत. मागील दोन वर्षांखाली देण्यात आलेल्या सुविधेत यंदा १० टक्क्यांनी वाढ होणार आहे.
वारीमार्गात सेवा देणाऱ्या सेवेकऱ्याचे नाव नोंदणी करून घेण्याचे आदेश ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. या सेवकांचे आरोग्य तपासून करून त्यांना टी शर्ट देण्यात येणार आहे. वारी मार्गातील प्लास्टीक कचरा संकलित करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी कचरा संकलन केंद्र निर्माण करण्यात येत आहे.
वारीमार्गातील २,६०० पाणी स्रोतांची तपासणी करण्यात येत आहे. या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पाण्याच्या ठिकाणी धोकादायक वायरिंग नसल्याचीही खात्री करण्यात येत आहे. २ हजार ४०० शौचालयांपैकी ४० टक्के शौचालय महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. वारी काळामध्ये गर्दी असल्याने मोबाइलला नेटवर्क मिळत नाही. या दरम्यान चांगले नेटवर्क मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्विस प्रोव्हायडर कंपन्यांना पत्र पाठविले आहे. या कंपन्यांनी चांगली सेवा देण्याचे मान्य केले आहे.
७० गावात सॅनिटरी नॅपकिनची व्हेंडिंग मशीन
आषाढी वारी मार्गात असलेल्या ७० गावांत सॅनिटरी नॅपकिनची सोय करण्यात येणार आहे. यासाठी व्हेंडिंग मशीन व वापर झालेले नॅपकिन नष्ट करण्यासाठी वेगळ्या मशीनची सोय करण्यात येणार आहे. एखाद्या महिलेकडे बाळ असल्यास त्या बाळाला दूध पाजण्यासाठी विशेष कक्षाची सोय करण्यात येणार आहे.
-------
अशी होतेय वारीची तयारी
- - जिल्हा परिषदेकडून वारी मार्गातील सर्व गावांना भेटी
- - हॉटेलची पाहणी तर कामगारांची तपासणी
- - प्रत्येक गावात लाइनमन पाहणार विजेची स्थिती
- - विजेचा धक्का लागणार नाही याची दक्षता
- - गाव सुरू झाले व गावाची हद्द संपली याचे बोर्ड
- - हरवले-सापडलेल्यांसाठी कंट्रोल रूम
- - स्वच्छतेसाठी जिल्ह्यातील एनजीओची मदत