सोलापूर : टीईटी प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश राज्य शासनाने दिले; यामुळे या आदेशानुसार शिक्षण विभागाकडून टीईटी प्रमाणपत्र जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी दिलेल्या मुदतीत फक्त २८ शिक्षकांनी प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केले आहेत; यामुळे शिक्षण विभागाकडून सर्व शाळांकडून माहिती गोळा केली जात आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षापासून आतापर्यंत सातवेळा घेण्यात आली. यात २०१३ पासून ते आतापर्यंत ८७ हजारांपेक्षा जास्त उमेदवार टीईटीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यातील क्वचितच उमेदवार हे नोकरीस लागलेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात नोकरीला लागणार याची संख्याही पाचशे ते हजारपर्यंत असेल, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे; पण निश्चित आकडा अधिकाऱ्यांना मिळालेला नाही.
दरम्यान, टीईटी प्रमाणपत्र पडताळणीसाठी सध्या अर्ज करण्याचे आवाहन करूनही क्वचितच शिक्षकांनी अर्ज जमा केले आहेत. यामुळे उर्वरित शिक्षकांचे प्रमाणपत्र कसे तपासले जाणार याची चर्चा शिक्षकांमध्ये होत आहे.
टीईटी परीक्षामध्ये भ्रष्टाचार
टीईटी पेपरफुटीमुळे अनेक गोष्टी समोर येत असून, यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचा समावेश दिसून येत आहे. आर्थिक व्यवहारांमधून मोठ्या प्रमाणात टीईटी परीक्षामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. यातूनच काही उमेदवार बोगस प्रमाणपत्र काढून उत्तीर्ण झाले आहेत. याचा तफावत संबंधित आकडेवारीवरून दिसून येत आहे. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. काहीजणांनी बनावट प्रमाणपत्र घेतल्यामुळे त्यांना नोकरी मिळाली आहे. यामुळे याची सखोल चौकशी शिक्षण विभागाने करून त्या सर्व शिक्षकांवर, संस्थाचालकांवर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा.
- प्रशांत शिरगूर, प्रदेश सरचिटणीस, डी. एड., बी. एड स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य
सुतापासून स्वर्ग
काही दिवसांपूर्वी राज्यात पेपरफुटीचे प्रकरण समोर आले. या प्रकरणाने आता राज्यभर व्याप्ती केली असून पेपरफुटी प्रकरणापासून आता बनावट टीईटी प्रमाणपत्रापर्यंत हा मुद्दा येऊन पोहोचला आहे. यामुळे राज्य शासनाने २०१३ पासून ज्या शिक्षकांनी टीईटी प्रमाणपत्र जमा केले आहे, त्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.
टीईटी प्रमाणपत्रांची तपासणीसाठी सोलापूर जिल्ह्यातून ६ जानेवारीपर्यंत २८ शिक्षकांनी अर्ज आले आहेत. या सर्व शिक्षकांचे टीईटीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत; तर पुढील काही दिवसांत आणखी जात प्रमाणपत्र आल्यास तेही पडताळणीसाठी पाठविले जाणार आहे.
- किरण लोहार, प्राथमिक, शिक्षणाधिकारी