सोलापूर विद्यापीठाचा विद्यार्थी कौशल्यपूर्ण असणार - मृणालिनी फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:03 PM2018-05-21T12:03:53+5:302018-05-21T12:03:53+5:30
मुख्य इमारत बांधून विद्यापीठाला एक नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना दिली.
संताजी शिंदे
सोलापूर : जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या सोलापूर विद्यापीठात केवळ पदवी न घेता प्रत्येक विद्यार्थी ज्ञान आणि कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडला पाहिजे. मुख्य इमारत बांधून विद्यापीठाला एक नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना दिली.
डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, महाराष्ट्रात प्रथमत: १ आॅगस्ट २0१४ रोजी जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली होती, तेव्हा मला खूप समाधान वाटले होते. ३५ वर्षांचा शैक्षणिक क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्याने त्याचा उपयोग उच्च पातळीवरील शिक्षणासाठी करण्याची इच्छा होती. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जाहिरात निघाली आणि मी अर्ज केला. मोठ्या आत्मविश्वासाने मी मुलाखतीला सामोरे गेले. माझी निवड झाली आणि एका जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळत असल्याने आनंद झाला.
मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व अन्य महाराष्ट्रातील १२ विद्यापीठांच्या तुलनेत सोलापूर विद्यापीठात काम करण्याची खूप संधी आहे. विद्यार्थीकेंद्रित विद्यापीठावर आपला भर असणार असून, या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस चालवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. विद्यापीठात भाषा विषय असला पाहिजे त्यात प्रामुख्याने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू यांचा समावेश असेल. टेक्नॉलॉजीचा स्वतंत्र विभाग करण्यावर माझा भर असणार आहे.
विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदे कसे मिळतील याचे नियोजन करून, कौशल्य विकासावर आधारित कार्यशाळा घेणे, परिसंवाद इतके जरी केले तरी खूप मोठा बदल होईल. विद्यार्थ्यांची कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल. प्राध्यापकांच्या योजना राबविणे आणि विद्यार्थ्यांच्या विकासावर सातत्याने मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे. विद्यापीठाचा सर्वांगीण विकास करीत असताना पाश्चात्यांचे अनुकरण न करता भारतीय संस्कृती जोपासणे तितकेच आवश्यक आहे, असेही यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज...
- आधुनिक युगात स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे या मताची मी आहे. राज्यपातळीवर नव्हे तर देशपातळीवर विद्यापीठाची चमक दाखवण्यासाठी संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण विद्यार्थी या विद्यापीठात घडला पाहिजे. विद्यार्थ्याला केवळ डिग्री महत्वाची नसून संबंधित विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असा सल्ला यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिला.
- प्रतिवर्षी युवा महोत्सवाबाबत निर्माण होणाºया अडचणीबाबत विचारले असता डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, हा प्रश्न महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठातही आहे. युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या आवडीचा इव्हेंट असून त्यासाठी माहिती घेऊन मार्ग काढला जाईल.