कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत असल्याने लॉकडाउनची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे हातावर पोटप्रपंच करणारे हमाल, कष्टकरी कामगार, भाजीपाला, फळविक्री करणारे, खारमुरे, भेळ, वडापाव, भजी विक्री करणारे हातगाडीवाले व रस्त्याच्या कडेला बुटपॉलिश करणारे गटई कामगार धास्तावले आहेत.
गतवर्षी लॉकडाऊन पडल्यानंर सर्वाधिक हाल या हातावर पोट असणाऱ्या कष्टकरी वर्गाला सोसाव्या लागल्या. गेल्या पंधरा दिवसापासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. प्रशासनाकडून करमाळा तालुक्यात शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लेला दररोज रात्री सातनंतर कडक निर्बंध लावले आहेत. पुढे लॉकडाऊन होणार असल्याची चर्चा होत असल्याने कामगार वर्गातून चिंता व्यक्त होऊ लागली आहे. ‘कोरोनाचे सर्व नियम आम्ही पाळू पण लॉकडाऊन लावू नका, आमच्या पोटावर मारू नका’. अशी मागणी होत आहे.
----
लॉकडाऊनमुळे गेली आठ-नऊ महिने व्यवसाय करता आला नाही. मनात भिती व निराशा बाळगून जगावे लागले. उसनवारी करून प्रपंच केला. मास्क घालू, हात धुवू, गर्दीत जायचे टाळू पण लॉकडाउन करू नका.
- दत्तात्रय कानपुडे, गटई कामगार.
----
लॉकडाऊनचं दु:ख आम्ही भोगलं आहे. कामधंदा नसल्याने उपाशी राहण्याची वेळ आमच्यावर आली होती. एक धंदा बंद झाल्याने दुसरा धंदा सुरू केला आहे. एवढयात कुठं सुरळीत सुरू झालं असताना पुन्हा लॉकडाउन करू नये. सरकारनं घालून दिलेले सर्व नियम आम्ही पाळू पण लॉकडाउन नको.
- संतोष क्षीरसागर, भाजीविक्रेता.
---३०करमाळा
रस्त्याच्या कडेला गटई करणारा दत्तात्रय कानपुडे.