तुरे फुटल्याने माळशिरसमधील ऊस उत्पादक पुन्हा अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:48 AM2020-12-11T04:48:45+5:302020-12-11T04:48:45+5:30
माळशिरस : तालुक्यातील अर्थकारणाचा कणा समजला जाणाऱ्या उसावर सध्या शिवारात तुरे दिसू लागले आहेत. दुष्काळ अतिवृष्टी साखर कारखान्यांची ...
माळशिरस : तालुक्यातील अर्थकारणाचा कणा समजला जाणाऱ्या उसावर सध्या शिवारात तुरे दिसू लागले आहेत. दुष्काळ अतिवृष्टी साखर कारखान्यांची स्थिती आणि अनेक समस्यांच्या दडपणाखाली ऊस उत्पादक शेतकरी सापडला असताना पुन्हा नैसर्गिक धक्का बसला आहे. उसाला येणा-यामुळे उत्पादनात घट पदरी पडणार आहे.
दिवसेन दिवस उसाचा प्रश्न बिकट होत चालला आहे. तालुक्यातील उसाचा विचार करता सदाशिवनगर व चांदापुरी या कारखान्याचे गाळप बंद आहे. अतिरिक्त ऊस, दराची कोंडी, वादळात ऊस अस्ताव्यस्त, वीज भारनियमन , नादुरुस्ती, उंदीर, घुशी अशा अनेक समस्या शेतकऱ्यांपुढे आहेत. घाम गाळून जोपासलेले आडसाली ऊस सध्या शेतात उभा आहे. यातील असंख्य एकरातील फडावर तुर्रे डोलत आहेत.
---
उत्पादनात होणार घट
पूर्ण वाढ झाल्यानंतर विशिष्ट पोषक हवामानामध्ये उसाला तुरा येतो. तुरा येणे उसाची जात, जमीन प्रकार, भौगोलिक स्थान, पाऊसमान, मशागत तंत्र, खत, पाणी व तण व्यवस्थापन, इ.गोष्टींबरोबर हवामानाचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास पोषक ठरते. अशा अनुकूल हवामानात उसाच्या शेंड्यातील वाढणाऱ्या अग्रकोंबाचे रूपांतर फूलकळीत होते. नंतर तुरा बाहेर पडतो. तुरा आल्यानंतर उसाची वाढ पूर्णपणे थांबते. तुरा आल्यानंतर काही दिवसांत उसाची तोडणी झाली नाही, तर उसाला फुटवे फुटतात. दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होतो. त्यामुळे ऊस शेतात जास्त काळ राहिला तर उत्पादनात मोठी घट सहण करावी लागणार आहे.
---
फोटो : १० माळशिरस
माळशिरस परिसरात उसाच्या फडांना आलेला तुरा.