उसाच्या दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी शेतकऱ्यांनी कर्नाटकातील एन. एस. एल. शुगर लिमिटेड भुसनूर (तालुका आळंद) येथील साखर कारखान्याला अक्कलकोट तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरी उसाला कर्नाटक दर मिळत असल्याच्या भावना ऊस उत्पादक व्यक्त करीत आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील हरणा, बोरी नदीकाठ व कुरनूर धरण परिसरातील उसाच्या फडात कर्नाटकी साखर कारखानदारांची टोळी दिसू लागली आहे. बऱ्हाणपूर,हन्नूर, बावकरवाडी, चुंगी, शिरवळ, वागदरी आदी गावांमध्ये जवळपास पन्नास गाड्या व टोळ्या कार्यरत आहेत. वर्षभर अगोदर नगदी खर्च व लागवड करून कारखान्यांना घातलेल्या उसाचे बिल मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.
कर्नाटकातील साखर कारखाने एक ते पंधरा तारखेच्या आत गेलेल्या उसाला अनामत रक्कम म्हणून १६ ते ३० तारखेच्या आत २१०० रुपये देत आहेत. यामुळे जो कारखाना पैसे देईल त्या कारखान्याकडे वळत आहेत.
---गेल्या वर्षी माझ्या शेतातून दुष्काळामुळे १४ टन ऊस कारखान्याला पाठवला होता. बिल मिळविण्यासाठी वारंवार सोलापुरातील कारखान्याला हेलपाटे मारून अनेकांचे हातपाय पडण्याची वेळ आली. यावर्षी आमच्या परिसरामध्ये कर्नाटकातील साखर कारखान्याची टोळी आली आहे. पंधरा दिवसाच्या आत बिल मिळत असल्यामुळे आम्ही यावर्षी जो बिल देतो त्यांना ऊस देत आहोत.
माणिक बोकडे, शेतकरी बऱ्हाणपूर
----कर्नाटकातील कारखान्याच्या ५० गाड्या व ऊसतोड कामगार अक्कलकोट तालुक्यात काम करत आहेत. यावर्षी कारखान्याच्या वतीने २१०० रुपये अनामत रक्कम रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहे. उर्वरित रक्कम ठरल्यानंतर देण्यात येणार आहे. अक्कलकोट तालुक्यांमध्ये शेतकऱ्याकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
संगप्पा कुडले, चिटबॉय शिरवळ.
----०४बऱ्हाणपूर-ऊस