करमाळा : गुळसडी येथील विठामाई खंडागळे माध्यमिक विद्यालयातील एका सहशिक्षकाने करमाळा शहरात गणेशनगर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने करमाळ्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बळीराम गोविंद वारे (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या सहशिक्षकाचे नाव असून, गुरुवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.
बळीराम वारे हे गुळसडी येथील खंडागळे विद्यालयात सन २००२ पासून कला व मराठी विषयाचे शिक्षक म्हणून कार्यरत होते.
वारे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. ते करमाळा शहरातील गणेशनगरमध्ये राहतात. त्यांचे मूळ गाव रत्नापूर (ता. जामखेड) असून, हिवरे (ता. करमाळा) ही त्यांची सासूरवाडी आहे. जिल्हा दूध संघात कार्यरत असणारे शैलेश वारे यांचे ते बंधू होत. विद्यार्थी प्रिय शिक्षक गेल्याचे दुःख मुख्याध्यापक एस. एम. शिंदे यांनी व्यक्त केले. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून पोलीस तपासात स्पष्ट होणार आहे.
----
आर्थिक फसवणुकीतून गुन्हा?
आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. त्यांची आर्थिक फसवणूक झाली असून, त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.
----
फोटो : २२ बळीराम वारे