सोलापूर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण राममोगली पडाल (३८) यांनी गुरूवारी घरात टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही बाब रविवारी मध्यरात्री उघडकीस आली़ कर्करोगाचा त्रास आणि चित्रपट निर्मितीसाठी घेतलेले खासगी कर्ज अशा दुहेरी संकटात सापडल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
खासगी कर्जामुळे सावकारांकडून तगादा लावण्यात येत असल्याचे, आत्महत्येपूर्वी कल्याण यांनी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्रालयाला दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले होते. या अर्जाची प्रत आता स्थानिक पोलिसांना देण्यात आल्याचे पडाल कुटुंबीयांनी सांगितले. कल्याण यांचे ज्येष्ठ प्रा़ व्यंकटेश पडाल यांनी ‘बांधकाम व्यवसायातून जमवलेले काही पैसे कल्याणने ‘म्होरक्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी गुंतवले़ दुर्दैवाने कल्याणला यकृताचा कर्करोग झाल्याचेही निष्पन्न झाले़ या धक्क्याने वडिलांचे महिन्यांपूर्वीच निधन झाले़ कर्करोग उपचारांसाठी कल्याणने खासगी सावकाराकडून काही पैसे घेतले होते़ त्यामुळे सावकारांचा तगादा सुरू होता़
पत्नीची फिर्याद; दोघांविरुद्ध गुन्हा’- मयत कल्याण यांना जानेवारी २०१८ पोटदुखीचा त्रास वाढल्याने त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर हैदराबाद व पुणे येथे उपचार घेण्यात आले. त्यावेळी मयत कल्याण यांना कॅन्सर आणि काविळ झाल्याचे समजले होते.मयत कल्याण यांनी उपचारासाठी आरोपी श्रीनिवास संगा व संतोष बसुदे या दोघांकडून एक लाख रुपये उसने घेतले होते. त्याच्या बदल्यात ते ९ लाख रुपये मयत कल्याणला मागितले होते. या त्रासाला कंटाळून कल्याणने आत्महत्या केल्याची फिर्याद रेणुका यांनी रविवारी रात्री अशोक चौक पोलीस चौकीत दिली.
जिवे ठार मारण्याची धमकी दिली- आरोपीने मयत कल्याण यांना त्यांच्या घरामध्ये घुसून बायका आणि मुलांना उचलून नेण्याची धमकी देऊन वेळ पडली तर ठार मारण्याची धमकी दिली होती.