वडिलांच्या खूनप्रकरणी मुलासह सुनेस जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:24 PM2019-05-21T12:24:04+5:302019-05-21T12:26:26+5:30
सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय
सोलापूर: वडिलांच्या खूनप्रकरणी मुलासह सुनेस जिल्हा सत्र न्यायाधीश यू. बी. हेजीब यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सोमवारी जिल्हा न्यायालयात या खटल्याचा निकाल लागला. सिकंदर अशोक शिंदे (वय ३५ वर्षे) व राणी सिकंदर शिंदे (वय ३० वर्षे, रा. मोरवंची, ता. मोहोळ, जि. सोलापूर) अशी जन्मठेप झालेल्या आरोपींची नावे आहेत. अशोक विश्वंभर शिंदे असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, मोरवंची (ता. मोहोळ) दि. २१ जून २०१८ रोजी ८.३० च्या सुमारास मयत अशोक विश्वंभर शिंदे यांच्या घरी अशोक शिंदे, मुलगा सिकंदर अशोक शिंदे व सून राणी सिकंदर शिंदे यांच्यामध्ये भांडण चालू होते. त्यावेळेस त्यांच्या शेजारी राहणारा अशोकचा भाऊ वसंत विश्वंभर शिंदे हा तेथे आला. त्यावेळी सून राणी हिने मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेली अॅट्रॉसिटी व अन्य केस काढून घेते म्हणून जात असताना अशोक विरोध करीत तिच्या (सुनेच्या) अंगावर धावून गेला. या प्रकाराने चिडून अशोकचा मुलगा सिकंदर चिडून माझ्या बायकोच्या अंगावर धाऊन गेला म्हणून त्याने जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने अशोक याच्या डोक्यात मारले. त्याचवेळी राणीनेही हातात वीट घेऊन अशोकच्या डोक्यावर फेकून मारली. दोघांच्या मारहाणीने अशोकला रक्तस्त्राव होऊन तो खाली पडला. अचानक घडलेल्या या प्रकाराने सिकंदर आणि राणी तेथून पळून गेले.
जखमी अवस्थेतील अशोक यास त्याचा भाऊ वसंत याने रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी आरोपी सिकंदर आणि राणी यांच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात भा. दं. वि. ३०२, ३४, अन्वये गुन्हा दाखल झाला, या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
यात सरकार पक्षातर्फे अॅड. पी. एस.जन्नू, अॅड. एस. एस. क्यातम तर आरोपीतर्फे अॅड. आर. बी. बायस यांनी काम पाहिले. या खटल्यासाठी तपासी अधिकारी म्हणून सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व कोर्ट पैरवी म्हणून सहायक फौजदार बिराजदार यांचे सहकार्य लाभले.
साक्षीदार अन् प्रयोगशाळेचा अहवाल महत्त्वपूर्ण
- या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ७ साक्षीदार तपासले. त्यातील फिर्यादी, पंच, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व डॉक्टर यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. तसेच रासायनिक प्रयोगशाळेचा अहवालही महत्त्वाचा ठरला. सरकारपक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना सरकारी वकील जन्नु यांनी उच्च न्यायालयाचे अनेक न्यायनिवाडे सादर केले. आरोपींनी केलेला गुन्हा हा अक्षम्य असून, त्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी केली. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ३ महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.