सोलापूर-तुळजापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण अखेर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2020 12:49 PM2020-10-09T12:49:59+5:302020-10-09T12:59:12+5:30
रेल्वे प्रशासनाची माहिती : भूसंपादनाची प्रक्रिया सुरू
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील मराठवाड्याला जोडणाºया महत्त्वपूर्ण अशा सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद-बीड-जळगाव रेल्वेमार्ग लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे़ त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत़ सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, भूसंपादन (जमीन संपादित) करण्याचे काम सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़ याबाबत सोलापूरचे खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
मध्य रेल्वे विभागात असलेल्या सोलापूर विभागातील खासदारांची रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत आॅनलाइन बैठक झाली़ या बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी, खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा़ ओमप्रकाश निंबाळकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, उपव्यवस्थापक व्ही़ के़ नागर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप हिरडे आदी खासदार उपस्थित होते.
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद -बीड-जळगाव रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने मार्च २०१९ मध्ये मंजुरी दिली होती, त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून सर्वेक्षणाचे काम हाती घेतले होते़ सोलापूरपासून शेवटच्या स्थानकापर्यंतचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे़ नकाशे, रेखांकनाचे काम प्रगतिपथावर आहे. भूसंपादनासाठीची सर्व कार्यवाही केली जात आहे. भूसंपादन, पूल व इतर कार्यासाठी इंजिनिअरिंग कन्सल्टंटची नेमणूक करण्याचे काम सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
नव्या गाड्या अन् थांबे वाढविण्यावर झाली चर्चा
रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्यासोबत खासदारांच्या झालेल्या आॅनलाइन बैठकीत सर्वच खासदारांनी नव्या गाड्या सुरू करण्यासोबत आहे त्या गाड्यांना जास्तीत जास्त रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यासंदर्भात चर्चा केली़ रेल्वे मंत्रालयाशी समन्वय साधून जास्तीत जास्त मागण्या, अडचणी, कामे पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही मत खा़ जयसिद्धेश्वर महास्वामी व खा़ रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले़