प्रशासनाकडून मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत कार्यक्रम आल्यानंतर निवडीबाबत जाहीर केले जाईल, असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. तोपर्यंत मात्र गावागावांत सरपंच कोण? याचीच चर्चा रंगताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये स्थानिक आघाड्यांकडून एक ते दोन उमेदवारांच्या फरकाने पॅनल निवडून आले आहे. विजयी उमेदवारांमध्ये सरपंचपदाचे उमेदवारही दोन ते तीन आहेत. त्यामुळे सरपंचपदाबाबत रस्सीखेच असल्याने दररोज नवीन आखाडे बांधले जात आहेत. कोण कोणाला मदत करेल, कोण कोणासोबत जाईल, याबाबत तर्कवितर्क लावले जात असताना मागील वाद-विवाद विसरून एकत्र येण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.
सहलीवरील उमेदवार गावाकडे येण्यासाठी इच्छुक
गेल्या १० दिवसांपासून अनेक गावांतील विजयी उमेदवार सरपंचनिवडीवेळी दगाफटका होऊ नये म्हणून देवदर्शनाच्या सहलीवर आहेत. त्यामधील बहुतांश उमेदवार शेतकरी, शेतमजूर, व्यावसायिक आहेत. अवघ्या काही दिवसांत परत येऊ, या आशेवर पॅनलप्रमुखांनी त्यांना सहलीवर पाठविले. मात्र, १० दिवसांचा कालावधी उलटूनही माघारी येण्याबाबत काहीच ठाम निर्णय होत नसल्याने शेती, जनावरे, व्यवसाय याबाबत व्यक्तिगत कामे खोळंबली आहेत. त्यामुळे आम्ही तुमच्याशिवाय कोणालाही मदत करणार नाही, असे म्हणत सहलीवरील उमेदवार गावाकडे परत येण्यासाठी धडपडत आहेत. त्यामुळे पॅनलप्रमुखांची धाकधूक वाढली आहे.
कोट ::::::::::::::::::::::
आमच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत सरपंचनिवडीचा कार्यक्रम अद्याप आलेला नाही. मात्र, १३ तारखेच्या आसपास निवडी होतील, असा अंदाज आहे. त्यानुसार कार्यक्रम घेऊन निवडूक प्रोग्रॅम जाहीर केला जाईल.
- विवेक साळुंखे
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, पंढरपूर