शिक्षणपंडिता : सावित्रीबाई फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 02:28 PM2019-01-03T14:28:21+5:302019-01-03T14:29:02+5:30

१९ व्या शतकात समाजामध्ये ज्या प्रबोधनाला आरंभ झाला, त्यामध्ये अनेक समाजसुधारकांनी समाजासाठी आपले योगदान दिले. प्रतिकूल परिस्थितीत समाजकार्य केले. ...

Teacher: Savitribai Phule | शिक्षणपंडिता : सावित्रीबाई फुले

शिक्षणपंडिता : सावित्रीबाई फुले

googlenewsNext
ठळक मुद्देआजच्या आधुनिक युगात आजच्या शिक्षण व्यवस्थेला जमले नाही ते काम १९ व्या शतकात फुले दांपत्यांनी केलेसभोवतालची परिस्थिती आणि काळाची गरज ओळखून सावित्रीमार्इंनी तयार केलेला अभ्यासक्रम हा खºया शिक्षण पंडिताची ओळख

१९ व्या शतकात समाजामध्ये ज्या प्रबोधनाला आरंभ झाला, त्यामध्ये अनेक समाजसुधारकांनी समाजासाठी आपले योगदान दिले. प्रतिकूल परिस्थितीत समाजकार्य केले. समाजात योग्य ते परिवर्तन घडवून आणले. त्याच परिवर्तनाचा आधुनिक समाज उपभोग घेत आहे. सत्य, न्याय, समता, बंधूता यांच्या पायावर उभा असलेला ज्ञानोमुख आणि कर्तव्यनिष्ठ असा एकात्म समाज निर्माण करणे हे भारतीय समाज सुधारकांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीसाठी समाज सुधारकांनी आपल्या जीवनाचा त्याग करून समाजासाठी स्वत:ला अर्पण केले. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे. फुले दांपत्य ध्येयवेडे. क्रांतिकारक विचारातून क्रांतिकारक कार्याला जन्म देणारे होते म्हणूनच ते समाजाच्या प्रवाहाला बदलू शकले. 

महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालिन समाजातील शैक्षणिक परिस्थितीचे वर्णन आपल्या शब्दात केले आहे. शिक्षणाने स्त्री दास्यत्वाला झुगारून देईल. धर्म समजून घेईल. पुरुषाच्या बरोबरीने येईल, या भीतीपोटी स्त्री ही शिक्षण घेण्यास असमर्थ आहे. त्यांनी जर शिक्षण घेतले तर धर्म भ्रष्ट होईल. याविषयी मोठमोठ्या ज्ञानसंपन्न ऋषीचे दाखले देण्यास हा समाज विसरत नाही. जे पुरुष करू शकत नाही ते परिवर्तन स्त्रिया करू शकतात. म्हणूनच सावित्रीमार्इंना प्रथम शिकवून महात्मा फुल्यांनी त्यांना अपेक्षित असणारे परिवर्तन घडवून आणले. महात्मा फुल्यांचे शैक्षणिक विचारांचे महत्त्व सावित्रीमार्इंना पटले होते. जीवनाला विकसित करायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही सुधारणेचे मूळ हे शिक्षणच आहे, असे विचार समाजासमोर मांडले. 

महात्मा फुले यांनी ज्याप्रमाणे शाळा निर्मिती केली. त्याचप्रमाणे त्यांनी शाळेचा अभ्यासक्रम तयार केला. सावित्रीमाई यांच्या विचारविनिमयातून तो साकार झाला. अधिक भर हा वाचन, अर्थ सांगणे, व्याकरण शुद्ध लिहिणे, भूगोल, गणित, मोडी इत्यादी विषयावर भर देण्यात आला. अभ्यासक्रमासंदर्भात असे निदर्शनास आले की, अभ्यासक्रम हा शाळेनुसार तयार करण्यात आला. मागासवर्गीय शाळेतील अभ्यासक्रम शाळा नं. १ यात विद्यार्थी १०६, वर्ग पहिला-यात विद्यार्थी-१८ शिक्षक-विष्णू मोरेश्वर, अभ्यासक्रम बाळशास्त्रीकृत हिंदुस्थानचा इतिहास, मोडी वाचणे, व्याकरण, शुद्ध लिहिणे व ग्रंथावरून व्याकरण करणे, भूगोल, युरोप, एशिया व हिंदुस्थानचे नकाशे, बाळबोध व मोडी अक्षर वळविणे, एकेरी इष्टराशिकपावेतो गणित. शाळा नं. २ यात विद्यार्थी ८३ वर्ग पहिला- यात विद्यार्थी-१५, शिक्षक के. सो. त्र्यंबक अभ्यासक्रम-बालमित्र भाग पहिला याची १०० पाने मोडी वाचणे, व्याकरण शास्त्र, ग्रंथावरून व्याकरण करणे, भूगोल, एशिया व हिंदुस्थानचे नकाशे, महाराष्टÑ अखेरचा संक्षेप तैराशिकपर्यंत गणित. 

याचाच अर्थ अभ्यासक्रम तयार करताना जी तत्त्वे लक्षात घ्यावी लागतात ती या ठिकाणी लक्षात घेतली आहेत. मुलांचा परिसर लक्षात घेण्यात आला. आजही महात्मा फुले,सावित्रीबाई फुले यांनी तयार केलेल्या अभ्यासक्रमासंदर्भातील विचारांची गरज आहे. अभ्यासक्रम हा त्या-त्या परिसरानुसार तयार करण्यात यावा. ग्रामीण भाग असेल तर ग्रामीण वातावरण तेथील मुलांची बौद्धिक क्षमता इत्यादी बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत. शहरी भागाचा अभ्यासक्रम हा त्यानुसार असावा. अध्यापनासाठी लागणारा अभ्यासक्रम फुले दाम्पत्याने अतिशय विचारपूर्वक निर्माण केला होता हा अभ्यासक्रम तयार करीत असताना सावित्रीमाई फुलेचा सिंहाचा वाटा होता. सावित्रीमाईनी तयार केलेला अभ्यासक्रम जो की आजही आजच्या समाजापुढे आदर्श आहे. अध्यापनात गुणवत्ता होती. अभ्यासक्रम तत्त्वानुसार विचारपूर्ण होता. तेव्हा निकालही योग्यच लागत असे. निकालासाठी परीक्षा या नियमानुसारच घेतल्या जात त्यासंदर्भात कोणतीही तडजोड केली जात नसे. 

१७ फेब्रुवारी १९५२ ला प्रकटपणे परीक्षा घेण्यात आली, तो प्रसंग पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती. मुलांची परीक्षा घेतल्यानंतर त्याचे कौतुक करण्यात आले. २५ मार्च १८५३ रोजी एका साप्ताहिकाने एक इंग्रजी पत्र छापले. पाठशाळा या टोपणनावाने लिहिणाºया त्या पत्रलेखकाने मागासवर्गीय मुलांच्या वार्षिक परीक्षेच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. हा प्रसंग म्हणजे हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका नव्या युगाचा आरंभ मानला पाहिजे. परीक्षेचा प्रसंग हा फुले दांपत्यांच्या शैक्षणिक कार्याचा विजय होता. यामुळे शिक्षणाचा प्रसार तर झालाच, मात्र फुले दांपत्य जन-मानसात प्रसिद्ध झाले. वास्तविक पाहता तत्कालिन परिस्थिती अनुकूल नसताना स्त्रियांसाठी व अस्पृशांसाठी शाळा सुरू करणे, समाजातील वाईट प्रथांना विरोध करणे अशा बाबीमुळे सावित्रीमाईना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आजची पिढी सुखा-समाधानाने जगते हे सत्य नाकारून चालणार नाही. 
केवळ शाळा सुरू करून गप्प न बसता त्या शाळेचा अभ्यासक्रम तयार करून सावित्रीमाई फुल्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. जे काम आजच्या आधुनिक युगात आजच्या शिक्षण व्यवस्थेला जमले नाही ते काम १९ व्या शतकात फुले दांपत्यांनी केले हे विशेष होय. सभोवतालची परिस्थिती आणि काळाची गरज ओळखून सावित्रीमार्इंनी तयार केलेला अभ्यासक्रम हा खºया शिक्षण पंडिताची ओळख आहे, असेच म्हणावे लागेल. 
-प्रा. डॉ. धम्मपाल माशाळकर
(लेखक हे अभ्यासक आहेत.)

Web Title: Teacher: Savitribai Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.