अक्कलकोट : नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी शिवसेनेच्या वाटेवर का? या मथळ्याखाली बुधवारी ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले़ त्यामुळे त्यांना जिल्हाभरातून विविध पक्षांचे पुढारी आणि कार्यकर्त्यांतून विचारणा होत आहे़ काहींनी ‘चुकीचे पाऊल उचलू नका’ अशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. या बातमीमुळे तालुक्यात दिवसभर एकच चर्चा रंगली होती. मात्र खेडगींकडून याबाबत इन्कार करण्यात आला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधात भूमिका घेतलेल्या माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा जोर धरू लागली़ त्याचाच एक भाग म्हणून की काय? ते नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती देऊन सत्कार केला़ यामुळे सेना प्रवेशाची एकच चर्चा रंगली होती.८ जानेवारीच्या ‘लोकमत’ मध्ये खेडगी शिवसेनेच्या वाटेवर का? या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. यामुळे बसलिंगप्पा खेडगी यांना जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांकडून संपर्क सुरू झाला आणि चर्चा रंगली़ काहींनी सबुरीचा सल्ला देत, अशा प्रकारचे पाऊल उचलू नका, अशी सूचना केली. या सगळ्यांना खेडगी मात्र भाजप सोडून कुठेच जाणार नाही, अक्कलकोटच्या विकास निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगितले. यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
खेडगी यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतली असली तरी आतापर्यंत पक्षाकडून त्यांना कुठल्याही प्रकारची विचारणा झालेली नाही. मागील नगरपालिका निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या सर्वाधिक मताने जनतेतून निवडून येणाºया नगराध्यक्षाच्या यादीमध्ये त्यांचे नाव आहे. निवडणुकीचा धुरळा खाली बसला अन् मागील आठवडाभरापासून खेडगी कुटुंबाने शिवसेनेशी घरोबा करण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे़ अशी चर्चा तालुक्यात रंगू लागली होती. खेडगी कुटुंबीय मागील पाच वर्षांपासून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे समजले जातात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासाच्या प्रलंबित १७० कोटी निधीवर चर्चा केली आहे. स्वामी समर्थांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. विकास आराखड्यासंदर्भात बैठक लावण्यासाठी विनंती केली आहे. मी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्न कुठे येतो?- बसलिंगप्पा खेडगी,नगरसेवक, अक्कलकोट
बसलिंगप्पा खेडगी आपणांस भेटून अक्कलकोट शहर विकास आराखड्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगून माझ्याकडून सहकार्य मागितले़ याव्यतिरिक्त कोणत्याच विषयावर त्यांच्याशी चर्चा झालेली नाही़- संजय देशमुख,शिवसेना तालुकाप्रमुख, अक्कलकोट