कुंपणानेच शेत खाल्ले... एटीएम मशीनमध्ये कॅश भरणाऱ्यानेच पळविले १६ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 11:50 AM2022-03-20T11:50:41+5:302022-03-20T17:02:08+5:30
सोलापूर- पंढरपूर शहरात एटीएम मशिनमध्ये कॅश भरणाऱ्या तरुणानेच मशीनच्या चावीचा वापर करुन 16 लाख 11 हजार 500 रुपयांचा अपहार ...
सोलापूर- पंढरपूर शहरात एटीएम मशिनमध्ये कॅश भरणाऱ्या तरुणानेच मशीनच्या चावीचा वापर करुन 16 लाख 11 हजार 500 रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी आशिष मोहन दामजी (इसबावी, पंढरपूर), याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंद केला आहे.
सुत्राकंडून मिळालेल्या माहितीनुसार, सीएमएस इन्फो सिस्टिम लिमिटेड सोलापूर कंपनीकडून सर्व राष्ट्रीयीकृत बँकेतून रक्कम काढून ठरवून दिलेल्या एटीएम मशीनमध्ये भरली जाते. वाहन चालक सुरज बनकर, सुरक्षारक्षक ओंकार यादव, एटीएम कस्टोडीयन आशिष मोहन दामजी ( रा. इसबावी, पंढरपूर) व अतुल शांताराम धादवड (रा. उजनी कॉलनी, पंढरपूर) हे विविध ठिकाणच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी एसबीआय बँकेच्या पंढरपूर शाखेतून ३६ लाख रुपये कंपनीच्या गाडीतून (एमएच ४३ एडी ८२८७) घेऊन निघाले. इसबावी येथील विसावा मंदिराजवळील एसबीआय एटीएममध्ये १६ लाख रुपये भरायचे होते; परंतु तेथे १४ लाख रुपये भरले.
ही बाब सीएमएस इन्फो सिस्टिम लिमिटेड सोलापूर शाखा व्यवस्थापक सुहास व्यंकटराव कांबळे यांच्या लक्षात आली. यामुळे त्यांनी आशिष दामजी याला फोन करून दोन लाख रुपये कमी असल्याबाबत विचारले. त्यावेळी माझ्याकडून चुकून दुसऱ्या एटीएममध्ये पैसे भरले असतील, असे आशिषने त्यांना सांगितले. तसेच महुद येथील एटीएममध्येही ५ लाख रुपये कमी भरल्याची माहिती समोर आली. यामुळे कांबळे यांनी शहरातील सर्व एटीएममधील रकमेची तपासणी केली. या तपासणीदरम्यान आशिष दामजी याने १६ लाख ११ हजार रुपयांचा अपहार केल्याचे कांबळे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी त्याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.