सोलापूर/सांगोला - परप्रांतीय गवंडी काम करणाऱ्या तरुणाने अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेण्यासाठी रेल्वेत बसवून दिले. मात्र, नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांच्या मदतीमुळे तरुणाचा डाव फसला. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर अवघ्या 3 तासात पळून नेलेल्या मुलीला मीरज रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले. शुक्रवारी सांगोला तालुक्यातील एका गावात हा प्रकार घडला. पोलिसांनी मुलीला नातेवाईकांच्या स्वाधीन केले.
तालुक्यातील एका गावात घराचे बांधकाम करणाऱ्या परप्रांतीय तरुणाने त्याच बांधकाम समोरील घरातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून दुचाकीवरून पंढरपूरला नेले. तेथे त्या तरुणाने त्या मुलीला कुर्डूवाडी-मिरज पॅसेंजर रेल्वेत बसवून मिरज रेल्वेस्थानकावर उतरण्यास सांगितले. त्यानंतर तो परत ‘त्या’ गावात गेला. जेणेकरून अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा आपल्यावर संशय येऊ नये म्हणून बिनधास्त राहिला. परंतु त्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर संशय व्यक्त करून त्यास सांगोला पोलिसांच्या ताब्यात दिले.
सुरुवातीला हा मजनू पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. अखेर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मुलीला आपणच पंढरपूर येथून मिरज रेल्वेत बसवून पाठवून दिल्याचे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी क्षणाचाही विलंब न लावता सांगोला रेल्वेस्टेशन मास्तरसह मिरज पोलीस स्टेशनला संपर्क साधून कुर्डूवाडी-मिरज रेल्वे कोणत्या स्थानकापर्यंत गेली याची अचूक माहिती घेऊन पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना तत्काळ मिरज रेल्वे स्टेशनला रवाना केले. सुदैवाने रेल्वे स्थानकावर पोहोचण्यापूर्वीच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या अल्पवयीन मुलीला रेल्वेतून उतरताच ताब्यात घेत सुटकेचा निश्वास घेतला.
सदर अल्पवयीन मुलीला सोबत घेऊन सांगोला पोलीस स्टेशनला आणले. पोलीस स्टेशनला कायदेशीर बाबीची पूर्तता करून त्या अल्पवयीन मुलीला रात्री उशिरा नातेवाईकाच्या ताब्यात दिले. ही कामगिरी सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर, पोलीस हवालदार दत्ता वजाळे, पोलीस नाईक अभिजित मोहोळकर, पोलीस नाईक राहुल देवकाते, पोलीस नाईक दीपक भोसले, पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील, धुळा चोरमले, चालक सुनील लोंढे यांनी केली.