रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात विसरलेले साेन्याचे दागिने केले प्रवाशाला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 04:55 PM2022-06-06T16:55:56+5:302022-06-06T16:56:07+5:30
आजच्या कलीयुगात इमानदारीचे उदाहरण जगासमोर दिले.
अकलूज : रिक्षातील प्रवासी महिलेची विसरून राहिलेली बॅग आणि बॅगेतील सुमारे अडीच लाखांचे पाच तोळे सोन्याचा ऐवज रिक्षा चालकाने परत करीत, आजच्या कलीयुगात इमानदारीचे उदाहरण जगासमोर दिले.
महागाई व कोराेनानंतरची परीस्थिती या दाेन्ही बाबींच्या विचारात माणुसकी आणि इमानदारी संपुष्टात येईल की काय, अशी शंका वाटत हाेती; पण पाेलीस परिवारातून इमानदारीचं केलेलं काैतुक आणि सन्मान पाहता, इमानदार लाेकांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. असाच प्रसंग अकलूज शहरात घडला. शहरातील रिक्षा चालक बाळू साठे यांना आपल्या रिक्षात प्रवासी महिलेची विसरलेली बॅग सापडली. चौकशीअंती ही बॅग अतुल शेटे यांच्या घरच्यांची हाेती. शेटेही बॅगच्या शाेधात हाेते.
याेगायाेगाने पोलीस परिवाराशी संपर्क झाला अन् अतुल शेटे यांना बॅग व सोने परत मिळाले. अकलूज पोलीस ठाण्याचे पो.नि. अरुण सुगावकर यांनी रिक्षा चालक बाळू साठे यास पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन, पोह.रमेश सुरवसे पाटील, विनाेद काळे, डीबी स्टाफसह बाळू साठे यांचा हार घालून सत्कार केला.