पेपर लिहिताना विद्यार्थिनी अचानक खाली कोसळली; हातपाय वाकडे झाले, पंढरपूरातील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 10:17 AM2023-01-20T10:17:54+5:302023-01-20T10:19:44+5:30
चक्कर आली अन् निमित्त झाले
पंढरपूर: दोन ते तीन दिवसांपूर्वी केवळ किरकोळ स्वरूपाचा ताप आला होता. बरं वाटू लागल्यानंतर सकाळी लवकर उठली. चहा-बिस्कीट खाल्ले. जवळपास आठच्या सुमारास पेपर सुरू झाला. सव्वा नऊच्या सुमारास अचानक चक्कर येत असल्याचे निमित्त झाले.
शाळेतून पटकन दवाखान्यापर्यंत मृत्यूनं तिला गाठलंच. अस कसं झालं म्हणत मुलीच्या आईने फोडलेला हंबरडा मन हेलावणारा होता. पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये अनया आतुल भादुले (वय ९) हा गुरुवारी सकाळी ८ वाजता परीक्षा देण्यासाठी शाळेत आली. मराठीचा पेपर होता. अनयाने संपूर्ण पेपर सोडविला.
पेपर सुटण्यास काही वेळेचा अवधी असताना अनयाला झटका आला. तिने हातपाय वाकडे केले. अचानक झालेल्या प्रकाराने घाबरलेल्या वर्ग शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी हलविले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर तिच्यावर पंढरपुरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मेंदूला रक्तपुरवठा न झाल्याची शक्यता-
अचानक झटका आल्यानंतर अनया हिला तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान मेंदूचा प्रेशर वाढून मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत न झाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे डॉ. प्रदीप केसे यांनी कुटुंबीयांना सांगितले.
तीन दिवसांपूर्वी आला होता ताप-
अनया हिला दोन ते तीन दिवसांपूर्वी ताप आला होता. यानंतर औषधपचार घेऊन बरे वाटू लागल्यानंतर गुरुवारी ती परीक्षेसाठी शाळेला आली होती. परीक्षेच्या दिवशी सकाळी ती लवकर उठली. अंघोळ करत चहा-बिस्कीटदेखील घेतले. शाळेत पेपर सुटत आला असतानाचा तिला काळाने गाठले.