पंढरपूर : दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रार दुपारी दाखल झाली आणि काही तासातच महादेव सगर याला ताब्यात घेऊन चोरीला गेलेली मोटार सायकल जप्त केली. त्याचबरोबर त्याच्याकडून इतर ७ मोटरसायकली हस्तगत करण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोपान नारायण बंडगर (वय ४२, रा. सलगरे, ता-मिरज, जि.सांगली) व रुकमांगद एकनाथ सोनुरे (रा. लिंगनुर) हे दोघे २५ डिसेंबर रोजी पंढरपूर दर्शनासाठी आले होते. हे दोघे मोटारसायकल (एमएच १० बीके ५१०६) यावरुन आले होते. ते दोघे २६ डिसेंबर रोजी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन एकादशीनिमित्त भजनाचे जागरच्या कार्यक्रमासाठी काळामारुती वासकरवाडा येथे आले. ते मोटारसायकल लावून जागराचे कार्यक्रमासाठी गेले. त्यावेळी तेथून गाडी चोरीला गेली. याबाबत सोपान नारायण बंडगर याने पोलिसात तक्रार दिली.
यानंतर पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी तपासाची चक्रे फिरवत गाडी चोरणारा हा पंढरपूरचा असल्याची माहिती काढली. त्यांनतर महादेव सगर ( वय २६, रा. बत्तीस खोल्या, पंढरपूर) याला तत्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण पवार, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र गाडेकर, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, बिपीन ढेरे, पोना गणेश पवार, शरद कदम, सुजित जाधव, सुनील बनसोडे, राजेश गोसावी यांनी केली आहे.