सोलापूर : एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे सध्या सर्व एसटी गाड्या बंद आहेत, पण काही ठिकाणी एसटी प्रशासनाकडून नियुक्त करण्यात आलेल्या खासगी शिवशाही गाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांची काही प्रमाणात सोय होत आहे; पण सोलापुरातील सर्व खासगी शिवशाही गाड्या दुसऱ्या विभागात पाठवण्यात आल्यामुळे सोलापुरात फक्त एसटीच्या मालकीच्या शिवशाही गाड्या आहेत. यामुळे सोलापूर विभागात मागील अनेक दिवसांपासून एकही एसटी गाडी धावली नाही. यामुळे प्रवाशांना खासगी जीप गाड्या किंवा स्कूल बसमधून प्रवास करावा लागत आहे.
एसटी गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रकारे गैरसोय होत आहे. अनेक मार्गांवर खासगी बसेस धावत नसल्यामुळे प्रवाशांच्या अडचणीत मोठी वाढ होत आहे. तसेच एसटी गाड्या प्रामुख्याने ग्रामीण मार्गावर मोठ्या प्रमाणात धावत होत्या. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय होत होती. सध्या काही प्रमुख मार्गांवर खासगी वाहने धावत असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांवर प्रवाशांवर मोठा परिणाम होत आहे.
संप फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न
सोलापूर विभागात एसटी कर्मचाऱ्यांची एकजूट असल्यामुळे विभागातून अद्यापपर्यंत एकही गाड्या धावल्या नाहीत. अनेकवेळा अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना संपामधून फोडण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी ठरला, असे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.
गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अनेकवेळा खासगी गाड्या पूर्ण सीट भरेपर्यंत गाड्या जागेवरून हलत नाहीत. यामुळे तासापेक्षा जास्त वेळ गाडीत बसून जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावेत.
अनुल कदम, प्रवासी
आम्ही नेहमी पंढरपूर ते सोलापूर प्रवास करतो. त्यामुळे आमच्याकडे महिन्याचा पास आहे. पास काढून ही गाड्या बंद असल्याने आम्हाला सध्या खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे आम्हाला आर्थिक फटका बसत आहे.
कुमार नारखेडे, प्रवासी