करमाळा : आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा होऊ घातलेल्या गाळप हंगाम सुरु करण्यासंदर्भात कसलीच हालचाल दिसून येत नाही. आमदार रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोने या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्ज वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने सरफेसी ॲक्टनुसार जप्तीची कारवाई करुन कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोने सर्वात मोठी बोली लावून कारखाना १५ वर्ष भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला. त्यानंतर संचालक मंडळाने बारामती ॲग्रोच्या मागणीप्रमाणे सभासदांच्या सहमतीने १० वर्ष वाढवून २५ वर्षे भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. हा भाडेकरार होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत कारखाना चालू करण्यासंदर्भात कुठल्याही हालचाली बारामती ॲग्रोकडून होताना दिसत नाहीत.
गतवर्षी जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे उजनी धरण, सीना कोळगाव प्रकल्प, मांगी तलावासह सर्व छोटे-मोठे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावर्षी तालुक्यात गाळपासाठी ३० लाख मेट्रिक टन ऊस उभा आहे. जर आदिनाथ यावर्षी चालू झाला नाही तर अतिरिक्त ऊसाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे.
गाळपाअभावी ऊस शेताच्या बांधावर टाकण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आदिनाथ यंदा गाळप हंगाम घेणार की नाही, या संदर्भात बारामती ॲग्रोने आपली भूमिका लवकर स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
-----