पंढरपूर : कोरोना नियंत्रित आणण्याचे नियोजन फक्त कागदावर आहे. मंत्रिमंडळ आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ नाही. जे काही नियोजन केले जात ते फक्त कागदावर आहे, त्यामुळे ब्रेक द चेन हे मुख्यमंत्र्याचे स्वप्न मुंबईत बसून साकार होणार नाही त्यासाठी ग्राउंड लेव्हलला काम करावे लागेल असे म्हणत शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी आज प्रशासनाला लक्ष्य केले.
कोरोना पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सावंत आज पंढरपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा, सध्या कोरोना वाढत असून तो नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून होत असलेल्या उपययोजना याबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी सहसंपर्क प्रमुख तानाजी सावंत, अनिल सावंत, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, महावीर देशमुख, रवी मुळे, जयवंत माने, अनिल अभंगराव आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या उद्धव ठाकरे यांनी राज्यात ब्रेक द चेन ची मोहीम राबवित कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. मात्र या मोहिमेला त्यांच्यासोबत प्रशासनात काम करणारे अधिकारीच हरताळ फासत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी घालून दिलेले नियम राज्यातील प्रशासन अधिकारी मोडत तोडत असल्याने राज्यात दररोज कोरोनाची संख्या वाढत आहे. कोरोनाची परिस्थितीत हाताळण्यास राज्यातील प्रशासन कमी पडत असून सगळीकडे सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोपही आमदार सावंत यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ब्रेक दी चेन ही मोहीम राबवली आहे. पण तहसीलदार, पोलिस अधिकारी अशांची जबाबदारी आहे ते लोक सगळे कागदावरच राबवत आहेत. अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याने संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. असा गंभीर आरोप आमदार तानाजी सावंत यांनी केला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवायचा आसेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेवटच्या कर्मचाऱ्यांसोबत ग्राउंड लेव्हलला काम करावे लागेल, नागरिकांनी ही प्रशासनाला सहकार्य करून नियमाचे पालन केले तरच कोरोना आटोक्यात येईल अन्यथा यापेक्षा गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागेल असे तानाजी सावंत म्हणाले.