कुसळंब : बार्शी तालुक्यात पाथरी येथे भरदिवसा बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्याने कपाटातून जवळपास २३ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पळविल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
गुरुवारी सकाळी ११.३० ते दुपारी दीडच्या दरम्यान चाेरीची घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले होते. मात्र चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार सर्जेराव वैजनाथ पाटील (वय ७२, रा पाथरी, ता. बार्शी) हे गुरुवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास वीज बिल भरण्यासाठी बार्शीला गेले होते. प्रकाश नामदेव गायकवाड यांच्या घरी कार्यक्रम असल्याने पाटील यांच्या पत्नी सिंधूबाई त्यांच्या घरी गेल्या होत्या.
सर्जेराव हे वीज बिल भरून झाल्यानंतर किराणा बाजार घेऊन दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाथरीत परत आले. त्यांना घर उघडे दिसले. पत्नी सिंधूबाई घरातच आहेत समजून त्यांनी हाका मारल्या; परंतु त्यांचा आवाज आला नाही. त्यांनी घरात डोकावले असता कपाटातील कपडे विस्कटलेले दिसली. देवघरातील कपाटात पाहिले असता पाकीट खाली पडलेले दिसले. या पाकिटात पत्नीचे सोन्याचे गंठण, पाटल्या, बोरमाळ, लहान मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या आणि रोख १५ हजार रुपये असा एकूण आठ लाख २० हजार रुपयांचा एेवज लंपास केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर त्यांनी तत्काळ बार्शी तालुका पोलीस ठाणे गाठून घटनेची फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे पाथरीत दाखल झाले. त्यांनी पोलिसांना काही सूचना दिल्या आणि दोन पथके नेमली. वाशी, दुधाळवाडी, कळंब, परंडा, भूम या ठिकाणी ही पथके रवाना झाली आहेत. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करीत आहेत.