सोलापूर : अक्कलकोट नाक्याजवळ तीन चोरट्यांनी मारहाण करून रोकड व मोबाईल सीमकार्ड चोरून नेल्याबाबत ट्रकचालकाने वळसंग पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा उघड झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलने केलेल्या तपासात ट्रान्सपोर्ट मालकास गंडविण्यासाठी चालकाने खोटी फिर्याद दिल्याचे उघड झाले आहे. परमेश्वर तमशेट्टी (वय ३६, रा. बेळम, ता. उमरगा) याने याबाबत २0 फेब्रुवारी रोजी वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तो पुण्यातील अतिफ शेख (रा. सरिता हाईट्स, केशवनगर पुणे) यांच्या ट्रान्सपोर्टमधून आपल्या एमएच २५/यु ४३९ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये माल भरून इलाहाबादकडे निघाला होता. २0 फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजता कुंभारीजवळ थांबल्यावर क्लिनर लघुशंकेसाठी खाली उतरला. तीन चोरटे आले व एकाने क्लिनरला पकडले व दुसऱ्या दोघांनी केबीनमध्ये चढून तलवार व चाकूच्या धाकाने ३४00 रुपये व सीमकार्ड हिसकावून नेले असे फिर्यादीत त्याने नमूद केले होते. गुन्हा दाखल झाल्यावर वळसंग पोलीस ठाण्याचे फौजदार पात्रे यांनी तमशेट्टी याला रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे फोटो दाखविले व सीमकार्डचा तपास होण्यासाठी सायबरसेलचा आधार घेतला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान सीमकार्ड वापरातील हँडसेट ट्रान्सपोर्ट मालकाकडे आढळला. त्यावरून चौकशी केल्यावर अतिफ शेख यांचे मोबाईल विक्रीचे दुकान आहे. भाडे घेऊन येताना चालक तमशेट्टी याने त्यांच्या दुकानातून दीड हजारास जुना हँडसेट खरेदी केला. त्याने हँडसेट शेख यांच्याकडे परत करून पैसे घेतले. तेथे त्याने चोरट्यांनी दहा हजार लुबाडल्याचे सांगितले. यावरून पोलिसांचा संशय वाढला. त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखविल्यावर ट्रान्सपोर्ट चालकाचे दहा हजार बुडविण्यासाठी खोटी फिर्याद दिल्याची त्याने कबुली दिली.
फिर्यादीच निघाला चोर
By admin | Published: June 24, 2014 1:33 AM