सोलापूर: तहानेने व्याकूळ झालेल्या हरिणाने पाण्याचा शोध घेत घेत कॅनॉलजवळ आले. पाण्याच्या पिण्याच्या प्रयत्नात प्रवाहाबरोबर वाहत चालले. प्रसंगावधान राखत जवळच असलेले कृष्णा खोरे विभागाच्या अभियंत्यांसह ग्रामस्थांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर त्या हरीणास वाचवण्यात यश मिळाले. बीबीदारफळ परिसरातील कालव्यामध्ये रविवारी दुपारच्या वेळी ही घटना घडली.
त्याचे असे झाले. शिरापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी रविवारी दुपारी सुरु झाले. हे पाणी कालव्यातून बीबीदारफळ परिसरातून सायंकाळी पाच वाजता रानमसले परिसरातून पुढे टप्पा-२ नान्नजकडे गेले. बीबीदारफळ- मोरवंची रोडच्या पुढच्या बाजूला हरिण तहान भागवण्यासाठी कालव्यात उतरले.
कालव्यात उतरलेल्या हरीणाला बाहेर पडता येईना. पाण्याची पातळी वाढू लागल्याने हरिणाची तडफड सुरु झाली. यावेळी कालव्याच्या भरावावरुन सहायक अभियंता राजेंद्र ताटी, भाऊसाहेब पाटील, पी.ए.पाटील जात होते. हरिणाची तडफड पाहून अधिकारी कालव्यात उतरले. एकीकडे पाण्याचा प्रवाहातून बाहेर पडण्याची हरिणाची धडपड सुरु होती तर दुसरीकडे कालव्यावर उभारलेली माणसे पाहून हरिण अधिकच भेदरले.
अधिकारी हरिणाला बाहेर काढण्यासाठी आत उतरले परंतु ते घाबरुन इकडे- तिकडे पळू लागले. जवळपास एक तासाच्या प्रयत्नानंतर हरिण हाती लागले मात्र त्याची तडफड सुरु होती. बाहेर काढलेल्या हरिणाच्या पोटातील पाणी बाहेर काढणे सुरू असताना त्याला जखमा झाल्याचे दिसून आले. जखमा कोरड्या होत असतानाच हरिणाने त्याचा चपळपणा दाखविला. बघता..बघता हरिण दिसेनासे झाले. या हरिणाला सुखरुपपणे बाहेर काढण्यात नान्नज माळढोक अभयारण्याचे कर्मचारी मारुती गवळी व सुधीर गवळी यांनीही प्रयत्न केले.