सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने होणाºया प्रिसिजन गप्पांचे पर्व यंदा आपली दशकपूर्ती गाठत आहे. २७ ते २९ या तीन दिवसांच्या काळात होणाºया या गप्पांमध्ये साहित्य, मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. सुहासिनी शहा यांनी ही माहिती दिली.
यंदाचे वर्ष ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगुळकर, पु. ल. देशपांडे आणि संगीतकार सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य साधून २७ आॅक्टोबरला अक्षर त्रिवेणी या सांगीतिक कार्यक्रमाने या पर्वाला प्रारंभ होईल. या कार्यक्रमाचे निवेदन उत्तरा मोने करतील. अभिनेते संजय मोने आणि आनंद इंगळे अभिवाचन करतील.
२८ आॅक्टोबरला अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. पुणे येथील डॉ. मंदार परांजपे प्रभावळकरांना बोलते करून त्यांचा प्रवास उलगडतील. पुढील वर्षातील प्रिसिजन गप्पांच्या कार्यक्रमांतर्गत सोलापूरच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने गप्पांची मैफील घेण्याचा मनोदय यतीन शहा यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेदरम्यान कृतज्ञता आणि ई-लर्निंगचा प्रिसिजन पॅटर्न या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
२९ आॅक्टोबरच्या पुस्कार सोहळ्यानंतर एक आगळावेगळा टॉक शो होणार आहे. परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करणारे विविध क्षेत्रातील तीन वक्ते आपल्या कामाचे सादरीकरण करणार आहेत. या अंतर्गत कौस्तुभ ताम्हणकर ‘घरातल्या कचºयाचं करायचं काय?’ या माध्यमातून कचरा व्यवस्थापनाची संकल्पना मांडतील. सुजाता रायकर थॅलिसिमियाग्रस्त मुलांचे जग उलगडतील तर हत्तीशी मैत्री करणारे एलिफंट व्हिस्परर आनंद शिंदे हत्तींचे वर्तन आणि त्यांच्या स्वभावाबद्दल विशेष माहिती देतील.
‘स्नेहग्राम’, सोहन ट्रस्टला पुरस्कार- प्रिसिजन गप्पा अंतर्गत उल्लेखनीय समाजकार्य करणाºया दोन संस्थांचा गौरव करण्याची परंपरा आहे. त्या अंतर्गत २९ आॅक्टोबरला बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील अजित फाउंडेशन संचालित स्नेहग्राम प्रकल्पाला यंदाचा ‘प्रिसिजन कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाणार आहे. सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा हा रोख पुरस्कार असेल. तसेच रस्त्यावरील भिकाºयांच्या पुनर्वसनासाठी आणि आरोग्यासाठी कार्य करणारे दांपत्य डॉ. अभिजित आणि डॉ. मनीष सोनवणे यांच्या सोहन ट्रस्ट या संस्थेला स्व. सुभाषरावजी शहा स्मृती पुरस्काराने गौरविण्यात योणार आहे. दोन लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.