आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट
By विलास जळकोटकर | Published: June 28, 2023 04:03 PM2023-06-28T16:03:06+5:302023-06-28T16:05:36+5:30
तिघेही वारकरी : पंढरपुरातून सोलापुरात रुग्णालयात दाखल
विलास जळकोटकर, सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी, भाविक दाखल झाले आहेत. मंगळवारी वाखरी येथे गर्दीत घोड्याचा डोक्याला पाय लागून ८० वर्षाचे वारकरी जखमी झाले. दुसऱ्या वारकऱ्यांचा बीपी लो झाला आणि तिसऱ्यांचा मुक्कामी असताना झोपेत रात्री ११:३० वाजता फीट आली. तिघांना पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यातून सोलापुरात उपचारासाठी दाखल केले आहे.
यातील पहिली घटना वाखरी येथे आषाढी वारीच्या निमित्ताने शेकडो वारकरी जमलेले होते. गर्दीमध्ये या वारीमध्ये सहभागी झालेले सोपानराव गुंडाजी माळेगावे (वय- ८०, रा. औराळ राजूरा बु. ता. मुखेड जि. नांदेड) यांना अचानक घोड्याचा पाय त्यांच्या डोक्याला लागल्याने ते खाली पडले. एकच गोंधळ उडाला. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून पंढरपूरच्या सरकारी दवाखान्यात नेऊन प्रथमोपचार करण्यात आले. तेथून रात्री ९:२० वाजता सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये नातू गणेश याने दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दुसरी घटनेत वारीमध्येच असताना भगवान शिंदे (वय- ४६, रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांचादुपारच्या वेळी बीपी अचानक लो झाल्याने त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. त्यांच्यावर पंढपुरातील सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णवाहिकेद्वारे डॉ. अदित्य यांनी सोलापुरात शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असून, उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मुक्कामाच्या ठिकाणी रात्री आली फीट
तिसरी घटनेतील मच्छिंद्रनाथ बुवा (वय- ५२, रा. निटूर, ता. चंदगड जि. कोल्हापूर) हे वारीसाठी पंढरपुरात आले होते. पंढरपुरातील कवडे वाडा येथे त्यांचा मुक्काम होता. मंगळवारच्या रात्री ११:३० वाजता अचानक त्यांना फीट आली. आजूबाजूची सारी मंडळी जागी झाली. त्यांना तातडीने पंढरीतल्या सरकारी दवाखान्यात त्यांचे शेजारी कृष्णा पाटील यांनी हलवले. तेथील प्रथमोचारानंतर पहाटे तीनच्या सुमारास सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची तब्येत स्थिर असून, शुद्धीवर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. तिन्ही घटनांची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.