तुकोबांची पालखी जिल्ह्यात दाखल, अकलूज येथे स्वागत, पालकमंत्र्यांनी केले रथाचे सारथ्य
By admin | Published: June 30, 2017 12:25 PM2017-06-30T12:25:14+5:302017-06-30T12:25:14+5:30
-
आॅनलाइन लोकमत सोलापूर
अकलूज : राजीव लोहकरे/ शहाजी फुरडे-पाटील
तुका म्हणे सुखे पराविया सुखे
अमृत हे मुखे स्तवतसे
पायी काटा नेहटे व्यथा जीवा उमटे
तेणे पोटो संकटे पुढीलाचेनी
पंढरीच्या आषाढी एकादशी सोहळ्यासाठी देहूहून निघालेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आपल्या वाटचालीतील १२ वा व पुणे जिल्ह्यातील सराटी येथील शेवटचा मुक्काम संपवून विठ्ठलाचे साम्राज्य असलेल्या सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे दाखल झाला.
टाळ-मृदंगाच्या गजरात नीरा नदी पार करून अकलूजमध्ये दाखल झालेल्या या पालखी सोहळ्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सदाशिवराव माने विद्यालयात जिल्ह्यातील पहिल्या गोल रिंगणाच्या आनंदाने प्रफुल्लित होऊन जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी सहकारनगरी अकलूजमध्ये हा सोहळा विसावला.
सकाळी सात वाजता संस्थानचे विश्वस्त सुनील मोरे महाराज व पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे यांनी पादुका डोक्यावर घेऊन नीरा नदीकडे नेल्या. त्याठिकाणी या दोघांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी पादुकांना नदीत स्नान घातले व डोक्यावर पादुका घेऊन सराटीच्या जि. प. शाळेत आणल्या. बरोबर आठ वाजता पालखी सोहळा अकलूजकडे मार्गस्थ झाला.
नीरा नदी पार करून पालखी येत असताना नदीच्या अलीकडे सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे पालखीचे स्वागत करण्यात आले. प्रथम अश्वाचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू, माळशिरस पंचायत समितीच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, प्रांताधिकारी संजय जाधव, तहसीलदार बाई माने, आमदार हनुमंत डोळस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष उत्तम माने-शेंडगे यांनी स्वागत केले.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोहळा प्रमुख अभिजित मोरे, सुनील मोरे, बाळासाहेब मोरे महाराज, चोपदार काकासाहेब गिराम या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. पालखीला निरोप देण्यासाठी इंदापूरचे प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासन आले होते.
विठ्ठल नामाच्या गजरात हा सोहळा अकलूजकडे मार्गक्रमण करत होता. या वाटचालीत पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी रथाचे सारथ्य केले. सोहळा गांधी चौकात येताच अकलूज शहराच्या वतीने खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माजी खा़ रणजितसिंह मोहिते-पाटील, उपसरपंच धनंजय देशमुख, सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, किशोरसिंह माने, जि. प. सदस्य किशोर सूळ, ज्योती माने, हसीना शेख, हेमलता चंडोले, पांडुरंग देशमुख यांनी स्वागत केले.
----------------------------
अकलूजमध्ये पालखी मार्ग बदलला
दरवर्षी सोहळा गांधी चौकातून सरळ माने विद्यालयात येत होता. यंदा मुक्कामाचे ठिकाण बदलल्यामुळे सोहळा विजय चौक, ईदगाह मैदान, शिवसृष्टी, खाटीक गल्ली, विठ्ठल मंदिर आझाद चौक, सदुभाऊ चौकातून माने विद्यालयात आला, विठ्ठल मंदिरात यंदा मुक्काम नसल्याने मंदिराचे विश्वस्त सुरेश कोरे यांनी पालखीचे स्वागत करून नैवेद्य दाखवण्यात आला. पालखी प्रथमच शहरातून येत असल्याने अकलूजकरांनी घरासमोर रांगोळी काढून पालखीचे स्वागत केले.
---------------------------
प्रथमच नीरेत पादुकांना वाहत्या पाण्यात स्नान
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने नीरा नदीला पाणीच येत नव्हते. मागील वर्षी तर टँकरने पादुका स्नानासाठी नदीत पाणी सोडले होते. यंदा मात्र पाऊस चांगला झाल्यामुळे नदीत पाणी सोडलेले होते. त्यामुळे चार वर्षांत प्रथमच वाहत्या व मोकळ्या पाण्यात पादुकांना डुबकी घेऊन स्नान घालता आल्याचे पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे महाराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.