सोलापूर : मध्य रेल्वेने प्रवाशांच्या आणि साई भाविकांच्या सुविधासाठी विशेष गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार ६ एप्रिलपासून तिरूपती-साईनगर शिर्डी- तिरूपती विशेष साप्ताहिक एक्सप्रेस पुढील आदेश येईपर्यत धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, या गाडीचे सर्व कोचेस आरक्षित असणार असून ज्या प्रवाशांकडे कन्फर्म आरक्षण तिकीट असतील त्यांनाच प्रवास करता येणार आहे. या गाडीचे आरक्षण ७ मार्चपासून सुरू होणार आहे. ही गाडी तिरूपती स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक मंगळवारी रोजी सकाळी ८.३० वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी १०.४५ वाजता शिर्डी स्थानकावर पोहचणार आहे.
या गाडीला २ ब्रेकयान, ६ जनरल, ८ स्लिपर, ३ एसी थ्री टियर, १ एसी टू टियर असे एकूण १८ कोच असणार आहेत. कोरोना संदर्भातील राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. तरी प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.