एकाच बुंध्यावर तोतापुरी, हापूस अन् केसर आंबा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:13 AM2019-04-22T10:13:12+5:302019-04-22T10:15:15+5:30
मार्डीच्या युवकाचा प्रयोग; सेंद्रिय शेतीबरोबरच पशुपालन, शेळ्या, सशांचेही संगोपन
जगन्नाथ हुक्केरी
सोलापूर : सर्वच क्षेत्रात सध्या नवनवीन प्रयोगावर भर देण्यात येत आहे. मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील अॅग्री डिप्लोमा करणाºया युवकाने आपल्या शेतातच अशा नवीन प्रयोगावर भर देऊन त्याच्या शेतीला मार्गदर्शन केंद्रच बनविले आहे. स्वत:च्या आंब्याच्या बागेमध्ये एकाच आंब्याच्या बुंध्यावर हापूस, तोतापुरी अन् केसर या तीन वाणाचे कलम करून या तिन्ही वाणाचे तो उत्पादन घेत आहे.
लखन रामलिंग फसके (वय २२) असे त्या तरुण प्रयोगशील शेतकºयाचे नाव आहे.
वडिलोपार्जित शेतीत सुरुवातीला त्याने प्रयोग म्हणून पहिला प्रयत्न केला आहे. यात त्याला चांगले यश मिळत आहे. शिवाय बारमाही आंब्याची लागवड करून त्याचे वाण विकसित करण्याचा तो प्रयत्न करीत आहे. लखन फसके हा वडाळा येथील लोकमंगल कृषी महाविद्यालयात अॅग्री डिप्लोमा करीत असून, नवनवीन प्रयोगाचा ध्यास घेऊन आपली शेती विकसित करण्याचा त्याने प्रयत्न सुरू केला आहे. त्याला महाविद्यालयाच्या सचिवा अनिता ढोबळे यांच्यासह त्यांचे वडील रामलिंग, आई व आजी यांचीही मदत मिळत आहे.
आंब्याबरोबरच पेरू, सागवान, नारळ, फळस, जांभूळ यासह भाजीपाला, कांदा, ज्वारी, गहू ही पारंपरिक पिकेही तो घेतो. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन, शेळी, ससे पालनही करतो. त्याच्याकडे रेडा, म्हशी, गायीही आहेत. यात जर्सीपासून ते गावरान, खिलार जातीच्या गायींचा समावेश आहे.
अॅग्री कल्चरल डिप्लोमा तो नोकरी करण्यासाठी नव्हे स्वत:ची शेती विकसित करण्याबरोबरच इतर शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी करीत आहे. सेंद्रिय शेतीवर भर देत तो स्लरी म्हणजे जीवामृत स्वत: बनवत असून, जीवामृत बनविण्याची साधनेही त्याने विकसित केली आहेत. त्याच्या शेतात ४0 आंब्याची झाडे असून, यातील प्रत्येक झाडावर तो नवनवीन प्रयोग करीत आहे. एकाच झाडावर दोन किंवा तीन व त्यापेक्षा जास्त कलम करून एकाच झाडाच्या माध्यमातून विविध आंब्याच्या जातीचे उत्पादन तो घेत आहे. त्याने विकसित केलेले बारमाही आंबे सोलापूरच्या बाजारात आकर्षण ठरत आहे.
प्रयोगशीलतेबरोबरच कल्पकताही
मार्डीतील लखन फसके हा प्रयोगशील विद्यार्थी आहे. तो त्याच्या शेतात नेहमीच विविध प्रयोग करून शेतीतील नवीन प्रयोग जगाच्या शेतकºयांसमोर मांडत आहे. त्याच्याकडे प्रयोगशीलतेबरोबरच कल्पकताही आहे. यामुळे तो भविष्यात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून जगासमोर येईल, असे श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठानच्या सचिवा अनिता ढोबळे यांनी सांगितले.