रुपेश हेळवे
सोलापूर : कोणालाही विश्वास बसणार नाही, अशी ही घटना. फक्त साडेतीन वर्षांच्या मुलाचे चार भाषांवर प्रभुत्व आहे. याबरोबर दोनशे देशांच्या राजध्यान्यांची नावे, जागतिक कीर्तीच्या १२० लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे त्याला तोंडपाठ आहेत़ एवढेच नाही तर त्याच्या या तल्लख बुद्धीमुळे तीन जागतिक रेकॉर्ड त्याच्या नावावर झाले आहेत़ अशा विलक्षण, असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या मुलाचे नाव आहे तनवीर नलिनीकांत पात्रो.
तनवीरचा जन्म १ आॅक्टोबर २०१५ मध्ये झाला़ त्याचे वडील नलिनीकांत पात्रो हे ओडिशाचे आहेत़ ते सध्या तनवीरला मार्गदर्शन करतात़ त्याची आई सरिता उराडे पात्रो या औषध निर्माण अधिकारी असून, त्या जिल्हा क्षयरोग केंद्र सोलापूर येथे कार्यरत आहेत़ तो जवळपास दीड वर्षाचा असतानापासून त्याला विविध खेळ, पुस्तक यामधून विविध माहिती आई-वडिलांनी दिली़ तनवीरने लहान वयातच इंग्रजी, मराठी, ओडिया, हिंदी या भाषांवर प्रभुत्व मिळवले आहे.
तनवीरला डिसेंबर २०१८ मध्ये वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल अमेझिंग वंडर किड म्हणून किताब मिळाला. या वर्षी इन्क्रे डिबल बुक आॅफ रेकॉर्डमध्ये त्याने जागतिक विक्रम केले़ तर मार्च २०१९ मध्ये जीनियस बुक आॅफ रेकॉर्डमध्ये मेस्मेरायजिंग मेमरी किड हा किताब त्याने मिळवला. त्याच्या या पराक्रमामुळे अनेक पुरस्कार त्याला मिळाले आहेत.
यामुळेच सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड व सोलापूरचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते तनवीरचा सत्कार करण्यात आला आहे.
...इतकी माहिती त्याला तोंडपाठ तनवीरला जगातील १२० प्रमुख पुस्तकांच्या लेखकांची नावे तोंडपाठ आहेत. जगातील दोनशे पन्नास शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी लावलेले शोध यांची माहिती आहे़ सुमारे दोनशे पाच देशांच्या राजधान्या त्याला तोंडपाठ आहेत़ भारताच्या २८ राज्य तसेच ९ केंद्रशासित प्रदेशांच्या राजधान्याही त्याला माहिती आहेत़ सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची नावे तो सांगू शकतो़ जगातील ७५ देशांचे ध्वज तो पाहून सांगू शकतो़ भगवतगीतेच्या अठरा अध्यायांची नावेही त्याला पाठ आहेत.
घरात टीव्ही बंदच तनवीर हा एक वर्षाचा असल्यापासून त्याला आम्ही शिक्षण देत आहोत़ त्याला शिकवण्यासाठी घरातील टीव्ही आम्ही बंद ठेवला आहे़ त्याला जी काही माहिती द्यायची आहे ती आम्ही मोबाईलद्वारे देत आहोत़ तो नेहमी मोबाईलवर नासाचे विविध व्हिडीओ पाहत असतो़ तो अजून शाळेला जात नाही़ पण त्याला चित्रे जास्त असलेली पुस्तके बघायला आवडतात़ त्याला यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची इच्छा आहे़ - सरिता नलिनीकांत पात्रो, तनवीरची आई