लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी : येथील सदाशिव दत्तात्रय तोडकरी (वय ७०, रा. आगळगाव रोड) हे घरासमोर उभारले असता दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम ७० हजारांचे सोन्याचे रिमझिम लॉकेट बदामासह पाठीमागून हिसका मारून पळविल्याची घटना घडली.
याबाबत तोडकरी यांनी बार्शी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार तोडकरी हे सकाळी स्वत:च्या घरासमोर उभे होते. त्यावेळी दोघेजण एका दुचाकीवरून आले. त्यांना वाघमारे कोठे राहतात असे हिंदीतून विचारले. या आडनावाची कोणी व्यक्ती येथे राहात नसल्याचे सांगताच ते पुढे निघाले आणि तोडकरी घराच्या गेटकडे वळाले. इतक्यात ते दुचाकीस्वार परत आले आणि त्यांच्या मागे जाऊन पाठीमागून त्याच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. यावेळी तोडकरी यांनी आरडाओरड केली, पण तोपर्यंत ते पसार झाले.