एसटी अन् दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार, सोलापूर - बार्शी रस्त्यावरील दुर्घटना
By शीतलकुमार कांबळे | Published: February 2, 2024 06:09 PM2024-02-02T18:09:23+5:302024-02-02T18:10:11+5:30
अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.
कुसळंब : सोलापूर - बार्शी राज्य मार्गावर जामगाव हद्दीतील राजे हॉटेल जवळ एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात दि. २ फेब्रुवाारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला.
दत्ता सोमनाथ गुजर (वय ३०) व सलीम जब्बार शेख (वय २९, दोघे रा. रामेश्वर भूम, जि. धाराशिव) असे अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस सहाय्यक निरीक्षक जगदाळे, उपनिरीक्षक जनार्दन शिरसट, पोलीस हेडकॉन्स्टेबल रुपेश शेलार, राहुल बोंदर, बार्शी शहरचे कर्मचारी पोलीस अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले होते.
एसटी बस (एमएच ०९ , ईएम ८७५४) लातूरहून पुण्याकडे निघाली होती. दुपारी कुसळंब, जामगाव मार्गे ही बस बार्शीकडे पुढे जात असताना जामगावजवळ तीन किमी अंतरावर एसटी व दुचाकी (एमएच २५, एसी ६९३७) मध्ये अपघात झाला. एसटी बसखाली दुचाकी अडकली होती. दत्ता गुजर यांच्या डोक्याची कवटी फुटली होती. सलीम शेख यांच्या पायाला व डोक्याला जबर मार लागल्याने दोघे ठार झाले. एसटीने मोटरसायकल २०० मीटर फरफडत नेली. ती एसटीच्या खालीच अडकलेली होती. पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह बार्शी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्दन शिरसट हे करीत आहे.