लग्नानंतर नवदाम्पत्याला घेऊन देवदर्शनाला गेले; परतताना भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 10:31 AM2024-12-01T10:31:40+5:302024-12-01T11:26:55+5:30
लग्नानंतर देवकार्य उरकून परतताना घडली दुर्घटना.
Solapur Accident ( Marathi News ) : तेलंगणा राज्यातील भैरमकोट येथून देवकार्य उरकून सोलापूरला येत असताना, कर्नाटकातील आळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून धडक दिल्याने जीपमधील दोन ठार, तर सहा जण गंभीर जखमी झाले. हा दुर्दैवी अपघात शनिवारी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडला.
काशीबाई सुरेश चव्हाण (वय ६०), अंबादास बाबूराव पेंदू (वय ४८, दोघे रा. विनायकनगर) असे ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सुनील सुरेश चव्हाण (वय ४०), अनिल सुरेश चव्हाण (वय ४२), सुरेश बाबूराव चव्हाण (वय ६०), सानवी सुनील चव्हाण (वय ०४, चौघे रा. विनायकनगर, एमआयडीसी), अनुराधा चंद्रकांत गांगजी (वय ४०, रा. भवानी पेठ), विजय शंकरसा श्रीगिरी (वय ५०, रा. निलमनगर) हे सहा जण जखमी झाले आहेत.
अधिक माहिती अशी, चव्हाण कुटुंबीयात २५ नोव्हेंबर रोजी भारत चव्हाण यांचे लग्नकार्य पार पडले होते. त्यानंतर नवदाम्पत्याला घेऊन कुटुंबीय जीप गाडीतून तेलंगणा राज्यातील भैरमकोट येथे देवकार्यासाठी गेले होते. देवकार्य पार पडल्यानंतर ते शुक्रवारी रात्री पुन्हा सोलापूरच्या दिशेने निघाले होते. जीपमधून सर्व कुटुंबीय सोलापूरला येत असताना, कर्नाटक राज्यातील अळंद येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या एका मालट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक दिल्यानंतर जीप पुढे जाऊन २ ते ३ वेळा उलटली. यात काशीबाई चव्हाण व अंबादास पेंदू हे जागीच ठार झाले. अपघातामधील सहा जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी शनिवारी पहाटे व दुपारी १२ वाजेच्या सुमारास सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.