अल्पवयीन मुलांचा वापर करून दुचाकी चोरणारी टोळी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:16 AM2020-12-27T04:16:43+5:302020-12-27T04:16:43+5:30
याबाबत मोहोळ पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहोळ हद्दीत पेट्रोलिंग ...
याबाबत मोहोळ पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहोळ हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना कुरूल रोड परिसरात टोलनाका येथे एक जण चोरीची गाडी घेऊन थांबला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली. त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे यांच्यासह डीबी पथकातील सहायक फौजदार पितांबर शिंदे, प्रवीण साठे, हरिदास थोरात, गणेश दळवी यांना तत्काळ त्या ठिकाणी पाठविले. टोळ नाक्याजवळ ती संशयीत व्यक्ती दुचाकीसह थांबलेली दिसली. त्याच्याजवळील दुचाकीबाबत चौकशी केली असता, त्याने ती चोरून आणल्याचे सांगितले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने करूल येथे लावलेल्या एकूण ५ दुचाकी दाखवल्या. त्याच्याजवळील दुचाकीबाबत विचारणा केली असता, सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता, दत्तात्रय शिवाजी देवकते (रा. बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर), गंगाधर विठ्ठल अर्जुन (रा. सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट) व दोन अल्पवयीन मुले अशा चौघांची नावे निष्पन्न झाली. या चौघांनी ६ दुचाकी चोरल्याचे उघड झाले. यामध्ये फिर्यादी संदीप प्रभाकर बचुटे (रा. वरकुटे ता. मोहोळ) यांनी ३० नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या गुन्ह्यातील एमएच १३ बीई १२३६ नंबरची दुचाकी वरील फिर्यादीची असल्याचे निष्पन्न झाले, तसेच मोहम्मद जकरीया मोहम्मद जुबेर शेख (रा. विद्यानगर कुरुल रोड मोहोळ) यांची एमएच १३ एक्यू ३०६७, एमएच १३ बीजी ३८५६ यासह अन्य सहा दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
याप्रकरणी दत्तात्रय देवकते, गंगाधर अर्जुन यांसह दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखीन चोरीचे गुन्हे उघड होणयाची शक्यता पोलीस निरीक्षक सायकर यांनी व्यक्त केली आहे.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक अशोक सायकर, डी. बी. पथकातील सहा. फौजदार पितांबर शिंदे, प्रवीण साठे, हरिदास थोरात, गणेश दळवी यांनी केली. अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक संंतोष इंगळे करीत आहेत.
फोटो२६ मोहोळ क्राईम
दुचाकी चोरणाऱ्या टोळीसह पोलीस निरीक्षक अशोक सायकर, पितांबर शिंदे, प्रवीण साठे, हरिदास थोरात, गणेश दळवी आदी.