सोलापूर : दिवाळी सणानिमित्त सराफ दुकानातील रेलचेल पाहून दोघी बुरखाधारी महिला आत शिरल्या. बांगड्या दाखवण्यास सांगितले. यावेळी सेल्समनची नजर चुकवून १ लाख ८९ हजार ५२० रुपयांच्या ३ तोळे २ ग्रॅम दोन बांगड्या ढापल्या. आणि जुने सोने आणतो म्हणून पसार झाल्या. कल्याण ज्वेलर्स या सराफ दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
शहरातील प्रीझम डायग्नोस्टिक सेंटरच्या बाजूला कल्याण ज्वेलर्स हे सराफ दुकान आहे. अजित देवराजन शोभण्णा (वय- ३१, रा. संकल्प हॉईटस्, मोदी कब्रस्तान, सोलापूर) येथे मॅनेजर म्हणून काम पाहतात. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास दोन बुरखाधारी महिला दागिने खरेदी करायचे म्हणून दुकानात शिरल्या. त्यांनी सेल्समन भोसले यांना सोन्याच्या बांगड्या दाखवयाला सांगितल्या. सेल्समनने काही बांगड्या दाखवल्या मात्र त्या बुरखाधारी महिलांना आवडल्या नाहीत. त्याळंनी आणखी दुसऱ्या बांगड्या दाखवण्यास सांगितल्या.
सेल्समन भोसले दुसऱ्या बांगड्या दाखवण्यासाठी खाली वाकले असता त्या दोघींनी काऊंटरवरील बांगड्यापैकी दोन बांगड्या शिताफीने बुरख्यामध्ये लपविल्या. त्यांनी आम्ही आमचे जुने सोने आणतो म्हणून शिताफीने दोघीही दुकानाबाहेर पडल्या.काही वेळाने दोन बांगड्या नसल्याचे सेल्समनच्या लक्षात आले. त्यांनी मॅनेजर अजित यांना सांगितले. या प्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला असून, तपास फौजदार माळी करीत आहेत.सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघींचे कृत्य उघडकीस
बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात येताच शोधाशोध सुरु झाली. मॅनेजर अजित यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात बुरखाधारी महिलांनी या बांगड्या ढापल्याचे दिसून आले. त्यानुसार दोघींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.