उजनी धरण आले उपयुक्तमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:14 AM2021-07-23T04:14:54+5:302021-07-23T04:14:54+5:30
भीमानगर : उजनी धरण जलाशयावर व पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात गेो तीन दिवस दमदार पाऊस सुरू आहे. उजनी धरणात ...
भीमानगर : उजनी धरण जलाशयावर व पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात गेो तीन दिवस दमदार पाऊस सुरू आहे. उजनी धरणात ८८२२ क्युसेक विसर्ग होत आहे. त्यात गुरुवारी वाढ झाली असून ११,०८० क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
मागील पंधरा दिवसांपासून उजनीत २५०० ते ३००० क्यूसेकने विसर्ग येत होता. परंतु, रविवारपासून पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमध्ये जोरदार पाऊस सुरू झाला. दौंडमधील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी तीन दिवसांत उणेमधून उपयुक्तमध्ये अर्थात गुरुवारी सायंकाळी प्रवेश केला.
दरम्यान, गेल्या वर्षी उजनी धरणात ४९१.१०५ मीटर पाणीसाठा होता. उपयुक्त टक्केवारी १ होती. चालू वर्षी अजूनही धरण उपयुक्तमध्ये आले आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा खोऱ्यात अजूनही दमदार पावसाची गरज आहे. वरील सर्व धरणांतून उजनीमध्ये विसर्ग येतो.
दरम्यान, उजनीत येणाऱ्या विसर्गात वाढ झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. या विसर्गाच्या आधारावर उजनीत येत्या आठ दिवसांत दहा टक्के पाणीसाठा होईल, अशी आशा शेतकरी वर्गातून बाळगली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ भाग, भीमाशंकरचे डोंगर, लोणावळा परिसराचा पश्चिम भाग व धरणाच्या विस्तृत लाभक्षेत्र परिसरात दमदार पाऊस सुरू झालेला आहे. यामुळे मुळा,मुठा ,पवना, इंद्रायणी इत्यादी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली असून बंडगार्डन व दौंड येथून भीमा नदीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढू लागला आहे.
या अनुकूल परिस्थितीमुळे यावर्षी मे २१ चे अखेरीस उणे २३ टक्के पातळीत गेलेल्या उजनीच्या पाण्यामध्ये आज अधिक ००.०८ क्के पाणी साठा झालेला आहे. यामध्ये आता दिवसेंनदिवस वाढच होणार आहे .
----
उजनी धरण अपडेट्स
एकूण पाणीपातळी- ४९१.०३५मी
एकूण ६३ ६९ टीएमसी
उपयुक्त ०.०४ टीएमसी
टक्केवारी- ०.०७ टक्के
उजनीत येणारा विसर्ग
दौंड - १५३८५ क्यूसेक
बंडगार्डन- २७६४४क्यूसेक