उजनी धरणाची वाटचाल मृतसाठ्याकडे, आठ महिन्यांत ५४ टीएमसी पाण्याचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 04:58 PM2022-06-06T16:58:42+5:302022-06-06T16:58:47+5:30
तब्बल ६३ टीएमसी मृत्तसाठा : सोलापूरसाठी सोडतात २० टीएमसी पाणी
टेंभुर्णी : उजनी धरणातील तब्बल ५४ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आठ महिन्यांत संपला आहे. धरणाची वाटचाल आता मृतसाठ्याकडे सुरू झाली आहे. मागील पावसाळ्यात उजनी धरण ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शंभर टक्के भरले होते.
उजनी धरणातील पाणीसाठा पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस होऊनही पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरण अनेक वेळा ओव्हर फ्लो झाले आहे. कोयना व जायकवाडी या राज्यातील मोठ्या धरणांतील पाणी साठवण क्षमतेपेक्षा उजनी धरणाची साठवण क्षमता जास्त असल्याने ते राज्यातील सर्वांत मोठे पाणी साठा असलेले धरण म्हणून ओळखले जाते. उजनी धरण जेव्हा शंभर टक्के भरलेले असते तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणी असते, तर जेव्हा १११ टक्के भरलेले असते तेव्हा १२३ टीएमसी पाणी साठा असतो.
धरणातील १२३ टीएमसीपैकी ५४ टीएमसी पाणी साठा उपयुक्त आहे, तर ६३ टीएमसी पाणीसाठा मृत्त आहे, तर ६ टीएमसी पाणी अतिरिक्त आहे. जवळपास २० टीएमसी एवढे पाणी सोलापूर शहरासाठी वापरले जाते व उर्वरित साठ्यांपैकी बरेचसे पाणी शेतीसाठी विशेष करून ऊस पिकासाठी वापरले जाते. याचबरोबर धरणातील पाण्यावर अनेक मोठ्या शहरासह शेकडो लहान-मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, तसेच अनेक औद्योगिक वसाहतींसाठीही याच पाण्याचा वापर केला जातो. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यासह पुणे व अहमदनगर या जिल्ह्यातील कृषी, सामाजिक व राजकीय, तसेच औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने उजनी धरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
...............
४३ वर्षांत धरण ३३ वेळा शंभर टक्के
उजनी धरणात पाणी अडवण्यास प्रारंभ झाल्यापासून ४३ वर्षांत धरण ३३ वेळा शंभर टक्के भरले आहे व तेवढ्याच वेळा ते रिकामे झाले आहे. सन २०२० व २०२१ ला धरण १३ मे रोजी मायनसमध्ये गेले होते, तर २०१९ आली धरण १५ मे रोजी मायनसमध्ये गेले होते. चालू वर्षी मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मागील वर्षी पेक्षा २४ दिवसाने मायनसमध्ये जात आहे.
...................
धरणाची सद्य:स्थिती
- एकूण पाणी साठा ६३.९७ टीएमसी
- उपयुक्त साठा ०. ३१ टीएमसी
- टक्केवारी 0. ५९ %
- आउट फ्लो
- सीना माढा योजना : २९६ क्युसेक
- दहीगाव उपसा : ८८ क्युसेक
- भीमा सीना बोगदा : ७० क्युसेक
- मुख्य कालवा : १००० क्युसेक