साेलापूर : युक्रेन व रशियातील युद्धामुळे पामतेलाच्या आयातीवर परिणाम झाल्याने सोयाबीनला मागणी वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटलला दोनशे रुपयांनी वाढ झाली.
दिवाळीनंतर सोयाबीनचे भाव पडले. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणला नाही. गेल्या महिन्यात सोयाबीनचा भाव साडेपाच हजारांवरून सहा हजारापर्यंत गेला होता. तरीही भाव वाढेल या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन बाजारात आणलाच नाही. अशात युक्रेन व रशियात युद्ध सुरू झाले. यामुळे पामतेलाच्या आयातीवर परिणाम झाल्याने गोडेतेलाचे भाव प्रति किलोला दहा रुपयाने वाढले आहेत. गोडेतेलाचे भाव आणखी भडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचा सोयाबीन खरेदीकडे कल वाढला आहे. यामुळे बाजारात सतत सोयाबीनचे दर वाढत आहेत. बुधवारी साडेसात ते ७ हजार ८०० सोयाबीनला भाव मिळाला. दरात दोनशे रुपयाने वाढ झाल्याचे अडते अंबारे यांनी सांगितले.
तुरीच्या भावातही प्रति क्विंटल ५० रुपयाने वाढ झाली. हरभरा, मूग, उडीद, तिळाचे भाव मात्र स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शेती मालाचे प्रति क्विंटल दर पुढीलप्रमाणे. तूर : पिंक : ५८०० ते ६४११, हरभरा नवीन : ४६५० ते ४८७५, मूग : ६००० ते ६५००, उडीद : ५५०० ते ६०००, तीळ : ७५०० ते १००००.
भाव अजून वाढण्याची आशा
युक्रेन-रशिया युद्ध फार काळ चालले तर गोडेतेलाचे भाव भडकणार आहेत. त्यामुळे सोयाबीनचे मार्केट आणखी वाढेल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापारी चढ्या दराने सोयाबीनची मागणी करीत आहेत. भावात चढ उतार होताना दिसत आहे.
असे होते सोयाबीनचे दर
- २१ डिसेंबर : ५७४०
- २७ डिसेंबर : ६२००
- ३१ डिसेंबर : ६२१५
- १० जानेवारी : ६१५०
- २५ जानेवारी : ५९०५
- १० फेब्रुवारी : ६२४०
- २१ फेब्रुवारी : ६४३५
- २८ फेब्रुवारी : ७२००
- २ मार्च : ७८००