सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्यापीठ विकास मंचचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:36 PM2018-07-18T12:36:41+5:302018-07-18T12:38:11+5:30
सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्यापीठ विकास मंचने झेंडा रोवला. या निवडणुकीत चार पैकी तीन जागा विद्यापीठ विकास मंचने पटकावल्या तर सुटाला एक जागा मिळाली.
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्यापीठ विकास मंचने झेंडा रोवला. या निवडणुकीत चार पैकी तीन जागा विद्यापीठ विकास मंचने पटकावल्या तर सुटाला एक जागा मिळाली. ‘संस्था प्रतिनिधी’ या मतदारसंघात प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांचा दहा मतांनी पराभव केला.
अधिसभा सदस्यांमधून व्यवस्थापन परिषदेचे एकूण ८ सदस्य निवडून देण्यासाठी मंगळवारी अधिसभेच्या बैठकीत मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, यातील राखीव प्रवर्गातील चार सदस्यांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा सर्वप्रथम करण्यात आली.
यामध्ये ‘प्राचार्य’- व्हीजेएनटी प्रवर्गातून डॉ. अनंत शिंगाडे, ‘शिक्षक / विद्यापीठ शिक्षक’- एसटी प्रवर्गातून प्रा. भगवान अधटराव, ‘संस्था प्रतिनिधी’- एस.सी. प्रवर्गामधून अब्राहम आवळे, तर ‘पदवीधर’- ओबीसी प्रवर्गातून नीता मंकणी यांचा समावेश होता. त्यानंतर इतर प्रवर्गाच्या चार जागांसाठी प्रत्यक्ष मतदान घेण्यात आले. यासाठी नऊ उमेदवार रिंगणात होते.
एकूण ६० अधिसभा सदस्यांनी उपस्थित राहून मतदानाचा अधिकार बजावला. दुपारी १२.३० ते दीड या वेळेत मतदान झाले व दुपारी दोन वाजता मतमोजणीस लागलीच प्रारंभ झाला. सुरुवातीस प्राचार्य मतदारसंघाची मतमोजणी झाली. यात प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी ३२ मते घेऊन विजयी झाले. त्यांच्या विरोधात उभे असलेले प्राचार्य डॉ. भीमाशंकर भांजे यांना २३ तर प्राचार्य आर.आर.पाटील यांना अवघी पाच मते मिळाली. शिक्षक / विद्यापीठ शिक्षक मतदारसंघातून सुटाचे अध्यक्ष प्रा. हनुमंत अवताडे यांनी ३५ मते घेत विजय नोंदवला. त्यांच्या विरोधात प्रा.डॉ.अनिल बारबोले यांना २५ मते मिळाली.
प्रतिष्ठेची बनलेल्या संस्था प्रतिनिधी मतदारसंघाच्या एका जागेसाठी डॉ.बी.पी. रोंगे व स्वरूपाराणी मोहिते - पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. यात डॉ.बी.पी. रोंगे यांनी ३५ मते घेत बाजी मारली. स्वरूपाराणी मोहिते - पाटील यांना २५ मते पडली. पदवीधर संघाची लढत मात्र एकतर्फी झाली. यात अश्विनी चव्हाण यांनी ४१ मते घेत विजय नोंदवला. त्यांच्याविरोधात प्रा. सचिन गायकवाड यांना १८ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी काम पाहिले. अधिसभा सदस्य मकरंद अनासपुरे हे मात्र या बैठकीसही अनुपस्थित होते तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी या बैठकीस उपस्थिती लावली.
प्रतिष्ठेच्या लढतीत रोंगे यांची बाजी
- प्रतिष्ठेच्या बनलेल्या संस्था प्रतिनिधी मतदारसंघाच्या एका जागेसाठी स्वेरी कॉलेज पंढरपूरचे डॉ.बी.पी. रोंगे व अकलूजच्या स्वरुपाराणी मोहिते- पाटील यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. यात डॉ.बी.पी. रोंगे यांनी ३५ मते घेत बाजी मारली. स्वरुपाराणी मोहिते- पाटील यांना २५ मते मिळाली. दुसरीकडे पदवीधर मतदारसंघाची लढत एकतर्फी झाली. यात विद्यापीठ विकास मंचच्या अश्विनी चव्हाण यांनी ४१ मते घेत विजय नोंदवला. त्यांच्याविरोधात ‘सुटा’च्या प्रा. सचिन गायकवाड यांना १८ मते मिळाली.
पक्षीय बलाबल मात्र समान !
- नवनिर्वाचित व्यवस्थापन परिषद सदस्यांमध्ये सुटा आणि अ.भा.वि.प. पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच यांचे पक्षीय बलाबल ४-४ असे समान राहिले आहे. ‘सुटा’तर्फे प्रा.हनुमंत आवताडे, डॉ. अनंत शिंगाडे, अब्राहम आवळे, प्रा. भगवान आदटराव यांनी तर विद्यापीठ विकास मंचतर्फे डॉ. बी.पी.रोंगे, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, डॉ.निता मंकणी आणि अश्विनी चव्हाण यांनी यश संपादन केले आहे. असे असले तरी, अधिसभेत अधिराज्य असणाºया ‘सुटा’ला व्यवस्थापन परिषदेत त्यामाने वर्चस्व राखता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यास सुटातील गटबाजीच कारणीभूत ठरली आहे. विविध अधिकार मंडळांकडून नामनिर्देशित सदस्यांचे संख्याबळ विद्यापीठ विकास मंचचे अधिक असल्याने त्यांनी व्यवस्थापन परिषदेवर जोरदार मुसंडी मारली आहे.