सोलापुरातील उर्दू भवनाला असेल ग्रीन बिल्डिंगचा दर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 12:01 PM2020-01-08T12:01:49+5:302020-01-08T12:08:51+5:30
तीन मजली भवनाचे काम प्रगतिपथावर; तीन मोठे हॉल अन् आलिशान आॅडिटोरियमचा समावेश, दोन कोटी खर्च, मार्च-२०२१ पर्यंत होईल पूर्ण
सोलापूर : सोलापुरात उर्दू भवनाचे काम प्रगतिपथावर आह़े़ सिव्हिल हॉस्पिटलसमोरील १७०१ चौरस मीटर जागेवर आलिशान अशी तीन मजली पर्यावरणपूरक उर्दू भवन इमारत साकारत आहे़ सध्या तिसºया मजल्यावर स्लॅबचे काम सुरू आहे़ भवनाच्या बांधकामावर आतापर्यंत दोन कोटी रुपये खर्च झाले आहेत. मार्च २०२१ पर्यंत भवनाचे काम पूर्ण होईल़ विशेष म्हणजे, या उर्दू भवनाला ग्रीन बिल्डिंगचा दर्जा असेल आणि तीन मोठे प्रशस्त हॉल त्यासोबत एक भव्य आॅडिटोरियमचाही यात समावेश असणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता नागेश जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली.
स्मार्ट सोलापूरच्या धर्तीवर स्मार्ट उर्दू भवनाची निर्मिती सध्या सुरु आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून सोलापुरातील अल्पसंख्याक बांधवांकडून उर्दू भवनाची मागणी होती़ २०१२ साली पहिल्यांदा मान्यता मिळाल्यानंतर उर्दू भवनाला गती मिळाली़ पहिल्यांदा मान्यता मिळाली त्यावेळी साधारण चार कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता़ हा निधी कमी असल्याची तक्रार करत बांधकाम निधी वाढवून मिळावा, अशी मागणी येथील अल्पसंख्याक बांधवांनी केली़ त्यामुळे राज्य अल्पसंख्याक विभागाकडून निधी वाढवून मिळाला़ नऊ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली़ सध्या उर्दू भवन बांधकामास साडेपाच कोटी रुपयांची मान्यता असून यातील दोन कोटी रुपये खर्च झाले़ उर्वरित साडेतीन कोटी रुपये बांधकामाकरिता तसेच साडेतीन कोटी रुपये फर्निचर कामाकरिता अल्पसंख्याक विभागाकडून येणे अपेक्षित आहे.
ग्रीन संकल्पना
- उर्दू भवन ग्रीन संकल्पनेवर आधारित आहे़ भवन पूर्णपणे पर्यावरणपूरक असेल़ भवनात सर्वत्र मोठ्या प्रशस्त खिडक्या असतील़ टेरेसला सोलार रिप्लेक्टीव्ह पेंट असेल़ उष्णता शोषून घेण्याची क्षमता असलेल्या विटा वापरण्यात येणार आहेत. तसेच रिसायकल वॉटर सिस्टीम असणार आहे़ यासोबत तिन्ही मजल्यावर तीन मोठे सेमिनार हॉल असणार आहेत़ तसेच एक मोठा आॅडिटोरियम हॉल देखील असणार आहे़ पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था असणार आहे़विशेष म्हणजे, साडेतीन कोटी रुपयांचे फर्निचर काम होणार आहे़ त्यामुळे उर्दू भवन सोलापुरात आकर्षक असे ठिकाण होणार असल्याची माहिती सहायक अभियंता नागेश जाधव यांनी दिली.
उर्दू भवन होण्यासाठी आम्ही सोलापुरात अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला़ सुरुवातीला शासनाने निधी कमी दिलेला होता़ त्यामुळे निधी वाढवून मिळावा याकरिता देखील आम्ही अनेक वर्षे पाठपुरावा केला़ उर्दू भवन सर्वांसाठी असेल़ यात प्रशस्त ग्रंथालय असेल़ सभागृह असेल़ उर्दू भाषा आणि उर्दू साहित्य प्रचार आणि प्रसाराकरिता उर्दू भवनाची भूमिका मोठी असेल़ यामुळे सोलापूरच्या वैभवात भर पडणार आहे़ त्यामुळे भवनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे़
- अॅड़ यु़ एऩ बेरिया, माजी महापौर
सोलापूर समिती अध्यक्ष : अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलन