सोलापूर: दुसऱ्या लाटेत मास्कचा वापर व लसीकरणावर भर दिल्याने ६७८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. आता १० पेक्षा जादा रुग्ण असलेली ११८ तर कमी रुग्ण असलेली ४७४ गावे आहेत.
जिल्ह्यात काेरोनाची पहिली लाट २६ एप्रील २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात आली. त्यानंतर रुग्ण कमी झाले. मार्च २०२१ नंतर रुग्ण वाढत गेले. येथून दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली. दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण वाढले. ग्रामीणमधील १ हजार २४३ गावे, वाड्या वस्त्यापैकी बहुतांश ठिकाणी कोरोना पोहोचला. जुलैनंतर शहरात रुग्ण कमी होत गेले. ग्रामीण भागात अक्कलकोट, दक्षिण, उत्तर सोलापूर, मोहोळ, बार्शी, मंगळवेढ्यात रुग्ण कमी झाले. पण पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा व करमाळा या पाच तालुक्यातल संसर्ग कायम आहे.
या तालुक्यातील संसर्ग कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर तालुक्यात भोसे, गादेगाव, खेळभाळवणी, खरातवाडी, पळशी, माळशिरस तालुक्यात नातेपुते, माळशिरस, कदमवाडी,पिंपरी, अकलुज, कारूंडे, खुडूस, निमगाव, करमाळा तालुक्यात जिंती, देवळाली, उमरड, सांगोला, पाचेगाव, कडलास, महुद, वाटंबरे, आलेगाव, खवासपूर या गावांमद्ये सर्वाधिक रुग्ण ॲक्टीव्ह आहेत. याउलट कोरोनामुक्त झालेल्या गावांमध्ये ग्रामस्थ खबरदारी घेत आहेत. मास्कचा वापर, गरज असेल तरच बाहेर पडणे आणि गावातील ज्येष्ठांचे लसीकरण वाढविण्यावर भर दिल्याने गाव कोरोनामुक्त होण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे.