सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत असलेल्या शोभेच्या दारू कारखान्यात नववर्षाच्या पहिल्या दिवशी मोठा स्फोट झाला. या स्फोटात प्राथमिक माहितीनुसार पाच जण मयत झाले असून २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातात मयताचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.
बार्शी तालुक्यातील शिराळे-पांगरी हद्दीत शोभेच्या दारूचा कारखाना आहे. याठिकाणी फटाके, दारूगोळे तयार करण्यात येतात. याठिकाणी रविवार १ जानेवारी २०२३ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, किमान पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले. बार्शीतील अग्निशामक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांची टीमही दाखल झाली आहे. सदर घटनेमुळे स्फोट झाल्याने परिसरातील दोन किलोमीटरपर्यंतचा परिसरातील गवत जळून खाक झाले.
दरम्यान, अग्निशमन दल, पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. ही घटना पांगरी शिराळा रस्त्यावर असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात घडली. घटनेनंतर मोठा आवाज परिसरात झाला. तसेच धुराचे आणि आगीचे लोट परिसरात दिसून येत होते.